डुगडुगणाऱ्या पुलांची डागडुजी; उपनगरांतील ५० पुलांच्या दुरुस्तीवर पालिका करणार ४१ कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:32 AM2023-11-17T10:32:47+5:302023-11-17T10:32:53+5:30

हा निर्णय घेण्यापूर्वी पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याकडून या विभागातील पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.

41 crores will be spent by the municipality on the repair of 50 bridges in the suburbs | डुगडुगणाऱ्या पुलांची डागडुजी; उपनगरांतील ५० पुलांच्या दुरुस्तीवर पालिका करणार ४१ कोटी खर्च

डुगडुगणाऱ्या पुलांची डागडुजी; उपनगरांतील ५० पुलांच्या दुरुस्तीवर पालिका करणार ४१ कोटी खर्च

मुंबई : मोठ्या पुलांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती सुरू केल्यानंतर मुंबई पालिकेचा मोर्चा आता छोट्या पुलांकडे वळला आहे. पश्चिम उपनगरातील जवळपास ५० पुलांची कामे काढण्याचे पालिकेने ठरविले असून त्यासाठी सुमारे ४१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि मालाड या भागांचा समावेश असलेल्या तीन विभागांतील पुलांची कामे हाती घेतली जाणार असून यामध्ये नव्या पुलांची उभारणी, जुन्या-जीर्ण झालेल्या पुलांची डागडुजी, काही पुलांच्या मार्गिकेचा विस्तार अशा कामांचा समावेश आहे.

हा निर्णय घेण्यापूर्वी पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याकडून या विभागातील पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी मे. एस.जी.सी. कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर मालाड पी-उत्तर वॉर्डमधील १६ पूल, गोरेगाव पी-दक्षिण येथील २१ पूल आणि अंधेरी के-पश्चिम वॉर्डमधील १३ पुलांची निवड करण्यात आली.

 कंत्राट देण्यास कारण की... 

शिफारस करण्यात आलेल्या कंपनीला कंत्राट का देण्यात आले, याचे विवेचन पालिकेने केले आहे. लघुत्तम निविदा आणि कंपनीकडे सध्या कोणतीही कामे नाहीत, अशी दोन कारणे पालिकेने संबंधित कंपनीची शिफारस करताना दिले आहे. या कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी मे. सी.ई. इन्फ्रा (इंडिया) आणि मे. आर. ई. इन्फ्रा प्रा. लि. या दोन कंपन्यांनी निविदा भरली होती. मे. सी.ई. इन्फ्रा (इंडिया) या कंपनीने २४ कोटी ४१ लाख ५३ हजार ५८३ कोटी रुपयांची, तर मे. आर. ई. इन्फ्रा प्रा. लि.ने २७ कोटी ८८ लाख ४२ हजार ११० कोटी रुपयांची निविदा भरली होती.

आमच्याकडे काम नाही, कामगार बसून आहेत...

मे. सी.ई. इन्फ्राची (इंडिया) निविदा कमी किमतीची असल्याने या कंपनीला कंत्राट देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.  त्याचबरोबर आणखी एक मजेशीर कारण निविदा मंजूर करताना देण्यात आले आहे. या कंपनीने सप्टेंबर महिन्यात पालिकेला पत्र पाठवले होते.  आमच्याकडे स्वतःच्या मालकीचे साहित्य आणि यंत्रे आहेत, तसेच सद्य:स्थितीत आमच्याकडे काम नसल्याने आमचे बरेच कामगार कामाशिवाय बसून आहेत, असे या पत्रात म्हटले होते. त्यामुळे  लघुत्तम निविदा आणि त्यांनी सादर केलेले दर स्वीकारण्याचे प्रस्तावले आहे, असे पालिकेच्या प्रस्तावात म्हटले आहे.

Web Title: 41 crores will be spent by the municipality on the repair of 50 bridges in the suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.