मनपाच्या मराठी शाळांतील ४० हजार विद्यार्थी घटले, चार वर्षांतील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:15 AM2017-12-13T02:15:01+5:302017-12-13T02:16:43+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांत महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या १ लाख ३ हजार ४८ वरून ६२ हजार ६९२ विद्यार्थ्यांवर आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

40 thousand students of MNP schools decreased, four years' statistics | मनपाच्या मराठी शाळांतील ४० हजार विद्यार्थी घटले, चार वर्षांतील आकडेवारी

मनपाच्या मराठी शाळांतील ४० हजार विद्यार्थी घटले, चार वर्षांतील आकडेवारी

Next

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांत महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या १ लाख ३ हजार ४८ वरून ६२ हजार ६९२ विद्यार्थ्यांवर आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
प्रजा फाउंडेशनने मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या चार वर्षांत मनपाच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती लागली असून, एकूण ४० हजार ३५६ विद्यार्थ्यांची घट झाली आहे. मात्र, याच कालावधीत मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्येत १६ हजार ८०० विद्यार्थ्यांची तर सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १८ हजार ३१७ विद्यार्थ्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याचाच अर्थ मनपाच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे पाठ फिरवत मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाट मुंबईकरांनी धरल्याचे दिसत आहे.
पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असलेला कल पाहून २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून मनपाच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षी सेमी इंग्रजीच्या माध्यमात अवघे नऊ विद्यार्थी होते, चार वर्षांत ही संख्या १८ हजार ३२६ विद्यार्थ्यांवर गेली आहे. त्याच 
वेळी २०१२मध्ये मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ५७ हजार २३५असलेली विद्यार्थी संख्या आता ७४ हजार ३५वर पोहोचली आहे. मात्र, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

मराठी शाळांचे अस्तिव्य धोक्यात
मुंबई मनपाच्या मराठी शाळांतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास २०२१ साली एकही मराठी शाळा शिल्लक राहणार नाही, असा अंदाज प्रजा फाउंडेशनने व्यक्त केला आहे. याबाबत प्रजाने केलेल्या सर्वेक्षणात पालक महापालिका शाळांबाबत असमाधानी असल्याने विद्यार्थी संख्येत घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणातील नोंदींनुसार सुमारे ४८ टक्के लोक महापालिका शाळांंमधील सुविधांबाबत असमाधानी असून, ४६ टक्के पालकांना मनपा शाळांचा दर्जा खालावल्याचे वाटते आहे.

Web Title: 40 thousand students of MNP schools decreased, four years' statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा