चिंताजनक! मुंबईतील 40% तरुणाई तणावाखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 09:24 IST2018-08-29T09:21:34+5:302018-08-29T09:24:21+5:30
अवघ्या 13 टक्के पालकांना मुलांच्या मनस्थितीची कल्पना

चिंताजनक! मुंबईतील 40% तरुणाई तणावाखाली
मुंबई: मायानगरी मुंबईतील 40 टक्के तरुणाई तणावाखाली असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. शहरातील 20 ते 30 वयोगटातील तरुण तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली आहे. स्वत:ची प्रतिमा फारशी चांगली नसल्याचा समज, प्रतिमा उंचावण्यात येत असलेल्या अडचणी ही या तणावामागील महत्त्वाची कारणं आहेत. चिंताजनक बाब म्हणजे बहुसंख्य तरुणांच्या पालकांना त्यांच्या मुलाच्या मानसिक स्थितीची कल्पनाच नसते.
मुंबईतील 20 ते 30 या वयोगटातील जवळपास 40 टक्के तरुणाई तणावग्रस्त आहे. यातील बहुतांश तरुणांना तणाव दूर कसा करायचा, याची कोणतीही कल्पना नाही. हे तरुण तणाव दूर करण्यासाठी कोणतंही पाऊल उचलत नाहीत. चिंतेची बाब म्हणजे केवळ 13 टक्के पालकांना त्यांच्या मुलांच्या मानसिक स्थितीची कल्पना आहे. शहरातील 38 टक्के तरुणांना ते कायम तणावाखाली असतात, असं वाटतं. तर 22 टक्के तरुणांना कधीकधी तणावाचा सामना करावा लागतो. तरुणींच्या बाबतीत हेच प्रमाण अनुक्रमे 49 टक्के आणि 22 टक्के असं आहे.
पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सर्वेक्षणातून समोर आलेली ही आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. यासाठी 400 तरुण आणि 400 तरुणींशी सहा महिने संवाद साधण्यात आला होता. स्वत:ची प्रतिमा हे तरुणाईच्या तणावामागील सर्वात मोठं कारण आहे. स्वत:च्या दिसण्याबद्दल शहरातील 79 टक्के तरुणी आणि 68 टक्के तरुण समाधानी नाहीत. 68 टक्के तरुणींना आणि 48 टक्के तरुणांना कॉस्मिक सर्जरी करुन स्वत:चा लूक बदलण्याची इच्छा आहे.