२६ निकाल जाहीर होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 05:42 AM2017-09-02T05:42:21+5:302017-09-02T05:42:37+5:30

मुंबई विद्यापीठाने चौथी डेडलाइन चुकवल्यानंतरही निकालाच्या प्रक्रियेला गती प्राप्त झालेली नाही. शुक्रवारी विद्यापीठाने फक्त चारच निकाल जाहीर केले. आतापर्यंत विद्यापीठाने ४५१ निकाल जाहीर केले आहेत.

26 When will the results be announced? | २६ निकाल जाहीर होणार कधी?

२६ निकाल जाहीर होणार कधी?

मुंबई : मुंबई विद्यापीठाने चौथी डेडलाइन चुकवल्यानंतरही निकालाच्या प्रक्रियेला गती प्राप्त झालेली नाही. शुक्रवारी विद्यापीठाने फक्त चारच निकाल जाहीर केले. आतापर्यंत विद्यापीठाने ४५१ निकाल जाहीर केले आहेत. अजूनही ६५ हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई विद्यापीठ ३१ आॅगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर करेल, या आशेने हजारो विद्यार्थी विद्यापीठाच्या निकालाकडे डोळे लावून बसले होते. पण, या सर्व विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली आहे. ३१ जुलैची डेडलाइन चुकवल्यानंतर विद्यापीठ एक महिन्यात निकाल जाहीर करणार होते. पण, एक महिना उलटल्यावरही विद्यापीठाने अद्याप तब्बल ६५ हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी अजूनही केलेलीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारतच असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई विद्यापीठात सुरू असलेला गोंधळ अजूनही कमी झालेला नाही. हजारो विद्यार्थी रोज कलिना कॅम्पसमध्ये खेपा मारत आहेत. पण, रोज पदरी निराशाच पडते आहे. शुक्रवारी २६३ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी आले होते. या प्राध्यापकांनी मिळून ८ हजार ९९ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली. आता विद्यापीठाने स्वत:हून कोणतीही डेडलाइन ठेवलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव अधिकच वाढला आहे. दरम्यान या गोंधळाविरोधात कलिना कॅम्पसमध्ये शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले.

आता आंदोलन करायचीही लाज वाटते - आदित्य ठाकरे
मुंबई विद्यापीठाने निकालासाठी आता नवीन डेडलाइन देण्याऐवजी निकालबंदीचीच घोषणा करून टाकावी. विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतरही विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा होत नाही. विद्यापीठाच्या ढिम्म कारभारामुळे, आता आंदोलन करण्याचीही लाज वाटू लागली असल्याची संतप्त भावना, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांमुळे आधीच विद्यार्थीवर्ग हैराण होता. त्यातच आता जाहीर झालेल्या निकालांवरही संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या धोरणावर सडकून टीका केली. आॅनलाइन तपासणीसाठी टेंडर काढण्यात आले. उत्तर पत्रिकांच्या स्कॅनिंग, अत्याधुनिक संगणक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्चूनही, तीन महिन्यांत निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. त्यामुळे आणखी एखादी डेडलाइन देण्यापेक्षा, निकालबंदीची घोषणा करा, असा टोला त्यांनी हाणला.
डिजिटायझेशनचा हट्ट धरण्यापूर्वी आपल्या व्यवस्था त्याला अनुकूल बनविण्याची आवश्यकता असते, असे सांगत, ठाकरे यांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून विद्यापीठावर तोंडसुख घेतले. निकालाला होणारा विलंब एक प्रकारचा घोटाळाच असून त्याची चौकशी व्हायला हवी. मात्र, क्लीनचिटचा कागद तयार ठेवून चौकशी करून नका, असे सांगत त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला.

Web Title: 26 When will the results be announced?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.