सारांश: जिन जख्मों को वक्त भर चला हैं...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 08:34 AM2023-03-12T08:34:10+5:302023-03-12T08:34:31+5:30

नरसंहारक बॉम्बस्फोटांची मालिका किती भीषण असते याचा प्रत्यय मुंबईकरांनी घेतला. त्याला आता तीन दशके झाली आहेत.

1993 mumbai bomb blast series and its 30 years | सारांश: जिन जख्मों को वक्त भर चला हैं...

सारांश: जिन जख्मों को वक्त भर चला हैं...

googlenewsNext

जे. एफ. रिबेरो,  माजी पोलिस आयुक्त, मुंबई

नरसंहारक बॉम्बस्फोटांची मालिका किती भीषण असते याचा प्रत्यय मुंबईकरांनी घेतला. त्याला आता तीन दशके झाली आहेत. जगभर फोफावलेला दहशतवादाचा ऑक्टोपस नियंत्रणात ठेवायचा असेल, दहशतवाद्यांना रोखायचे असेल तर केवळ लष्करी अथवा पोलिसी बळाचा वापर करून चालणार नाही तर त्यासाठी अन्य मार्ग अवलंबावे लागतील हे या काळात दिसून आले आहे. याच मार्गांनी आजवर दहशतवाद्यांचे जाळे खणून काढण्यात यश आले आहे.

वंशवाद, वर्णवाद यातून कमालीचा द्वेष पसरून जगातील अनेक देशांमध्ये दहशतवादी गट, संघटना वाढल्या. आपले मार्ग चुकीचे होते हे दहशतवाद्यांना समजेपर्यंत अनेक निरपराधांचे हकनाक बळी गेलेले असतात. जर्मनी, स्पेनसह अनेक देश दहशतवादात भरडले गेले. अलीकडे भारतात जिहादी दहशतवाद कमालीच्या वेगाने पसरला आहे. पूर्वी दहशतवाद केवळ काश्मीर परिसरात होता. नंतर स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीने पंजाबमध्ये दहशतवाद बळावला. 

सीमाभागात रेंगाळणारा दहशतवाद मुंबईत आला तोच आपली भीषणता दाखवत. १२ मार्च १९९३ रोजी दाऊद इब्राहिमने आयएसआयच्या मदतीने मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवली तेव्हा त्याची भयावहता प्रथमच मुंबईकरांना अनुभवायला मिळाली. त्यानंतर मुंबईत अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. गेल्या तीस वर्षांच्या काळात वेगवेगळ्या दहशतवादी गटांनी, संघटनांनी या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली. या अनेक तोंडाच्या राक्षसाशी कसे लढायचे, हा यक्षप्रश्न आहे.

मुळात सीमेपलीकडे ठाण मांडून बसलेल्या या दहशतवादी संघटना देशातल्या कुठल्याही भागात घातपाती कारवाया कशा करतात, हे समजून घ्यावे लागेल. त्यांच्यासाठी अनेक स्लीपर सेल इथे काम करत असतात.  हे अतिरेकी गट धर्माच्या अथवा स्वतंत्र राष्ट्राची मागणी करीत एका मोठ्या समुदायाला चिथवत असतात. धर्म हा कळीचा मुद्दा असतो.

दहशतवादी गटांना समाजापासून वेगळे पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली की त्यांचे डावपेच अयशस्वी ठरू लागतात. त्यांना मिळणारी सहानुभूती नष्ट होऊ लागली की त्यांचे अस्तित्व धोक्यात येते. गेल्या तीन दशकांतील अतिरेकी कारवाया पाहिल्या की हे जाणीवपूर्वक लक्षात येते.  सर्वच घातपाती कारवाया थोपवता येत नाही. पण, समाजाची साथ असेल तर लष्कर अथवा पोलीस त्या बऱ्याच प्रमाणात थोपवू शकतात हे दिसून आले आहे. त्यासाठी हृदये जिंकावी लागतात, मने काबीज करावी लागतील.

३० वर्षे  मुंबई बॉम्बस्फोटांची

- स्थानिक जनतेची मने जिंकण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. मुंबईत सुरू झालेला मोहल्ला कमिटीचा उपक्रम हा त्यातलाच एक. जनतेचा कानोसा घेत ही लढाई लढली तर हा भस्मासुर गाडून टाकणे फारसे कठीण नाही. 
- मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतरच्या तीस वर्षांत अनके घातपात झाले तर त्यापेक्षा अनेक रोखण्यात यश आले, हेही नजरेआड करून चालणार नाही. 
- या काळात संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात पसरलेले अतिरेक्यांचे जाळे नष्ट करण्यात आले. शस्त्रास्त्रेही पकडली गेली. हे सारे तपास यंत्रणांना कुणीतरी मदत केली म्हणूनच झाले, हे नाकारता येत नाही.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 1993 mumbai bomb blast series and its 30 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.