१६० गिरणी कामगारांना लागली घरांची 'लॉटरी'

By सचिन लुंगसे | Published: December 20, 2023 08:59 PM2023-12-20T20:59:58+5:302023-12-20T21:01:07+5:30

लॉटरीमधील यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार / वारसांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या.

160 mill workers get housing lottery | १६० गिरणी कामगारांना लागली घरांची 'लॉटरी'

१६० गिरणी कामगारांना लागली घरांची 'लॉटरी'

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या लॉटरीमधील यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार / वारसांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडा व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिळकत व्यवस्थापक रामचंद्र भोसले आदींसह अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आठ टप्प्यांत चावीचे वाटप

२०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीमधील यशस्वी पात्र व घरांच्या विक्री किंमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १४७० गिरणी कामगारांना १५ जुलै पासून आठ टप्प्यांत चावीचे वाटप करण्यात आले आहे.

अभियान सुरू

५८ गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्याकरिता अभियान सुरू आहे. अभियानाला १४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुविधा विनामूल्य

अभियानांतर्गत ऑफलाइन कागदपत्रे वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे सुरू आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे. यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार, वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण ९५,८१२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७२,०४१ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/ अपात्र निश्चितीचे काम सुरु आहे.

Web Title: 160 mill workers get housing lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा