उपाहारगृहातील स्वयंपाकघरासाठी १५० चौरस फुटांची अट शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:35 AM2017-10-22T02:35:58+5:302017-10-22T02:36:07+5:30

उपाहारगृहांमधील स्वयंपाक घरांसाठी असणारी किमान १५० चौरस फुटांची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा विचार आहे.

150 square feet of relaxation for lunch room kitchen | उपाहारगृहातील स्वयंपाकघरासाठी १५० चौरस फुटांची अट शिथिल

उपाहारगृहातील स्वयंपाकघरासाठी १५० चौरस फुटांची अट शिथिल

Next

मुंबई : उपाहारगृहांमधील स्वयंपाक घरांसाठी असणारी किमान १५० चौरस फुटांची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा विचार आहे. मात्र उपाहारगृहांच्या उंचीबाबत असणारी किमान नऊ फुटांची अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उपाहारगृहांमध्ये ग्राहकांना अधिक जागा मिळेल, असा पालिकेचा दावा आहे.
मुंबईत उपाहारगृह सुरू करण्यासाठी किमान ३०० चौरस फूट आकाराची जागा असणे यापूर्वी बंधनकारक होते. तसेच या जागेपैकी किमान १५० चौरस फूट एवढी जागा स्वयंपाकघरासाठी वापरण्याची अटही घालण्यात आली होती. मात्र आता उपाहारगृहांच्या वैविध्याप्रमाणे स्वयंपाकघराला आकार देण्याची गरज भासत आहे. त्यामुळे उपाहारगृहातील स्वयंपाकघरांसाठी असणारी १५० चौरस फुटांची अट रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली.
मुंबईत मोठ्या प्रमाणात छोटी उपाहारगृह आहेत. पूर्वीच्या अटीप्रमाणे दीडशे चौरस फूट जागा स्वयंपाकगृहासाठी ठेवल्यानंतर ग्राहकांना बसण्यासाठी कमी जागा उरते. यामध्ये वेटरची ये-जा सुरू असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असते. इझ आॅफ डुइंग बिझनेस अंतर्गत ही अट शिथिल करण्यात आल्याने ग्राहकांची गैरसोय दूर होणार आहे.
महापालिकेने ही अट शिथिल केली तरी उपाहारगृहांसाठी आवश्यक असणारे मुंबई अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र पूर्वीप्रमाणेच बंधनकारक असणार आहे. अनेक उपाहारगृहांमध्ये कमी जागा असल्याने आगीच्या दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्याची संधी ग्राहक व स्वयंपाकींनाही मिळत नाही. यामुळे जीवितहानीचा धोका वाढतो. अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्यास आगीचे बंब पोहोचेपर्यंत आग आटोक्यात ठेवता येऊ शकते.

Web Title: 150 square feet of relaxation for lunch room kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.