बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलच्या १०० गिरणी कामगारांना मिळाली घरे  

By सचिन लुंगसे | Published: November 16, 2023 07:52 PM2023-11-16T19:52:07+5:302023-11-16T19:52:26+5:30

सातव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची संधी गिरणी कामगार/वारस यांना मिळाली आहे.

100 mill workers of Bombay Dyeing and Srinivas Mill got houses | बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलच्या १०० गिरणी कामगारांना मिळाली घरे  

बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलच्या १०० गिरणी कामगारांना मिळाली घरे  

मुंबई - बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी २०२० मध्ये जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र १०० गिरणी कामगार/वारस यांना वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या मुख्यालयात म्हाडा व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी आयोजित कार्यक्रमात घरांच्या चाव्या देण्यात आल्या. गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन यावेळी उपस्थित होते.

आतापर्यंत २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व घरांच्या विक्री किंमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १३१० गिरणी कामगारांना १५ जुलैपासून सहा टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. सातव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची संधी गिरणी कामगार/वारस यांना मिळाली आहे. उर्वरित गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगाने सुरू असून विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्क भरणा भरणा केलेल्या पात्र गिरणी कामगारांना लवकरच घरांच्या चावीचे वाटप केले जाईल.

रायगड जिल्ह्यातील कोन येथे एमएमआरडीएने बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. घरांच्या विक्री किंमतीचा भरणा केलेल्या सोडतीतील विजेत्या पात्र गिरणी कामगार/वारसांना पहिल्या टप्प्यांतर्गत इमारत क्रमांक ३ व ४ मधील ५०० घरांच्या चाव्यांचे वाटप लवकरच करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम सुरू आहे. - आ. सुनील राणे, अध्यक्ष, गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती
 
पात्रता निश्चिती अभियान
५८ बंद/आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता अभियान सुरू आहे. अभियानांतर्गत ऑफलाइन कागदपत्रे भरण्याचे काम वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉलमध्ये सुरू आहे.
 
विनामूल्य सुविधा
ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध असून ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन
७०२६७ गिरणी कामगार/वारसांनी ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर केली असून १०२०० गिरणी कामगारांनी ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर केली आहेत. 
 

Web Title: 100 mill workers of Bombay Dyeing and Srinivas Mill got houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई