lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुम्हीच स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलात!, नीरव मोदीचा ‘पीएनबी’ला दोष

तुम्हीच स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलात!, नीरव मोदीचा ‘पीएनबी’ला दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 03:10 AM2018-02-21T03:10:13+5:302018-02-21T03:10:25+5:30

You have ruined the stone on your feet! | तुम्हीच स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलात!, नीरव मोदीचा ‘पीएनबी’ला दोष

तुम्हीच स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलात!, नीरव मोदीचा ‘पीएनबी’ला दोष

नवी दिल्ली: सर्व देणी चुकती करण्याची मी ‘आॅफर’ दिली असताना, तुम्ही महाघोटाळ्याची विनाकारण आवई उठवून झटपट वसुलीची कारवाई सुरू केलीत. परिणामी, धंदा बंद झाल्याने माझ्याकडून वसुली करण्याच्या तुमच्या क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. तुम्हीच तुमच्या कृतीने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला, असे पत्र पीएनबीतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख नीरव मोदी याने बँकेला लिहिले आहे.
दि. १५/१६ फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या पत्रात मोदी लिहितो की, बँकेत तुम्ही घोटाळ्याची वाच्यता करण्याच्या आदल्या दिवशी (१३ फेब्रुवारी) व १५ फेब्रुवारी रोजी मी तुम्हाला ‘आॅफर’ दिली होती, परंतु थकीत रक्कम झटपट वसूल करण्याच्या अतिउत्साहात तुम्ही माझ्या ब्रँडची व धंद्याची वाट लावलीत. परिणामी, पैसे वसूल करण्याची तुमचीच क्षमता कमी होऊन थकीत रकमा वसूल न होता तशाच राहिल्या.
थकीत रकमेचा बँकेने जाहीर केलेला ११ हजार कोटी रुपयांचा आकडा अवास्तव आणि निष्कारण फुगविलेला आहे, असा आरोप करून मोदी म्हणतो की, माझ्या कंपन्यांची देणी फार तर ५ हजार कोटी रुपयांच्या घरात आहेत. तुम्ही रक्कम एवढी मोठी करून सांगितल्याने काहूर माजले. मी आणि व माझ्या कंपन्यांविरुद्ध तपास व जप्तीचा ससेमिरा सुरू झाला. परिणामी, फायरस्टार इंटरनॅशनल व फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल कंपन्यांना धंदा सुरू ठेवणे अशक्य झाल्याने बँकांची देणी चुकती करण्याचे मार्ग बंद झाले. तुम्ही फिर्याद दाखल केल्यावरही मी चांगल्या भावनेने तुम्हाला पत्र लिहिले व फायरस्टार गटाच्या मालमत्ता विकून देणी वसूल करण्याचे कळविले.
आपल्या समूहातील कंपन्यांचे देशभरातील व्यवसाय मूल्य ६,५०० कोटी रुपये आहे व त्यातून बँकांची सर्व देणी सहज चुकती होऊ शकली असती, परंतु सर्व बँक खाती गोठविल्याने व मालमत्तांवर टाच आल्याने आता ते शक्य नाही, असेही मोदीने नमूद केले आहे.
गेली कित्येक वर्षे आपण बँकांशी व्यवहार केले आहेत. रक्कम वेळेवर चुकती न केल्याची तक्रार करण्याची वेळ कधीही तुमच्यावर आली नाही. माझ्या खात्यांमधील व्यवहारांमुळे बँकेला विविध प्रकारच्या शुल्कापोटी कित्येक कोटी रुपये मिळाले. तेव्हा बँकेने न्यायाने वागावे आणि माझ्या कंपन्यांच्या करंट खात्यांमध्ये असलेल्या रकमेतून निदान माझ्या २,२०० कर्मचाºयांचे पगार तरी मला देऊ द्यावेत, अशी विनंती मोदीने केली आहे.

आपल्या ज्या कंपन्यांविरुद्ध बँका व तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. त्यात संबंध नसलेल्या नातेवाइकांना निष्कारण गोवल्याचा दावाही मोदीने केला आहे. तो लिहितो की, हे प्रकरण ज्या व्यवहारांशी संबंधित आहे, त्याच्याशी माझ्या भावाचा व पत्नीचा संबंध नसूनही त्यांचा संशयित आरोपी म्हणून नामोल्लेख केला गेला. माझ्या मामाचाही स्वतंत्र व्यवसाय आहे व त्याचा याच्याशी काही संबंध नाही. मी बँकेशी केलेल्या व्यवहारांची या तिघांना अजिबात कल्पना नाही.

Web Title: You have ruined the stone on your feet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.