lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीतील विविध प्रकारच्या बिलांचे प्रकार

जीएसटीतील विविध प्रकारच्या बिलांचे प्रकार

अनेक व्यापारी व्यापारात विक्रीचे बिल मॅन्युअली बनवतात, तसेच प्रत्येकाच्या बिलामध्ये माहिती कमी अधिक असते, परंतु जीएसटीमध्ये कायद्यात दिलेली बिलाविषयीची माहिती

By admin | Published: May 29, 2017 12:47 AM2017-05-29T00:47:00+5:302017-05-29T00:47:00+5:30

अनेक व्यापारी व्यापारात विक्रीचे बिल मॅन्युअली बनवतात, तसेच प्रत्येकाच्या बिलामध्ये माहिती कमी अधिक असते, परंतु जीएसटीमध्ये कायद्यात दिलेली बिलाविषयीची माहिती

Types of bills in GST | जीएसटीतील विविध प्रकारच्या बिलांचे प्रकार

जीएसटीतील विविध प्रकारच्या बिलांचे प्रकार

अर्र्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमध्ये प्रत्येक करदात्याला विविध प्रकारचे बिल बनवावे लागेल म्हणे. त्यामुळे मला आज जीएसटीत बिलांचे प्रकार, बिल कधी, कसे बनवावे याबद्यल सविस्तर माहिती सांग.
कृष्ण : (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सध्या अनेक व्यापारी व्यापारात विक्रीचे बिल मॅन्युअली बनवतात, तसेच प्रत्येकाच्या बिलामध्ये माहिती कमी अधिक असते, परंतु जीएसटीमध्ये कायद्यात दिलेली बिलाविषयीची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक बिलाची माहीती त्याला दर महिन्याला सरकारकडे द्यावी लागणार आहे. व्यवहाराच्या प्रकाराला अनुसरून बिलांचे प्रकार जसे टॅक्स इन्व्हॉइस, बिल आॅफ सप्लाय, डेबिट-के्रडिट नोट, रीसिट व्हाउचर इत्यादी नमूद केलेले आहेत.
अर्जुन : कृष्णा, मला सांग, टॅक्स इन्व्हॉइसमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करणे अनिवार्य आहे?
कृष्ण : अर्जुना, टॅक्स इन्व्हॉइसमध्ये खालील गोष्टी नमूद करणे अनिवार्य आहे. १) विक्रेत्याचे नाव व जीएसटी नंबर २) प्रत्येक आर्थिक वर्षासाठी शब्द व अंक व काही सिम्बॉल यांचा मिळून बिल नंबर ३) बिलाची तारीख ४) खरेदीदार नोंदणीकृत असेल, तर त्याचे नाव, पत्ता व जीएसटी नंबर ५) डिलिव्हरीचा पत्ता ६) वस्तू विकली असेल, तर त्याचा एच एस एन कोड व सेवा विकली असेल, तर त्याचा सर्व्हिस अकाउंटिंग कोड ७) वस्तू किंवा सेवेची माहिती ८) वस्तूची संख्या (क्वांटिटी) ९) वस्तू किंवा सेवा पुरवठ्याचे मूल्य १०) डिस्काउंट वजा करून, करपात्र वस्तू किंवा सेवा पुरवठ्याचे मूल्य ११) जीएसटीचा दर १२) करपात्र वस्तू किंवा सेवेवर आकारलेल्या कराची रक्कम १३) आंतरराज्यीय व्यवहारात पुरवठ्याचे ठिकाण व राज्याचे नाव १४) कर हा रिव्हर्स चार्ज तरतुदीनुसार असेल, तर ते १५) विक्रता किंवा अधिकार दिलेल्या व्यक्तीची सही किंवा डिजिटल सही.
अर्जुन : कृष्णा, बिल कसे, कधी व केव्हा बनवावे?
कृष्ण : अर्जुना, प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीला वस्तू पुरवठ्यासाठी पाठविताना बिल बनवावे लागेल. सेवा असेल, तर सेवा दिल्यानंतर ३० दिवसाच्या आत बिल बनविणे अनिवार्य आहे. छोट्या दुकानदारांसाठी जर विक्रीचे मूल्य २०० रुपयांच्या आत असेल, तर बिल बनविण्याची गरज नाही. त्याने दिवसभरात २०० रुपयांची विक्री केलेल्या सर्व व्यवहाराची गोळाबेरीज करून एक बिल बनवावे. जर विक्रीची रक्कम २०० रुपयांपेक्षा अधिक असेल, तर ‘टॅक्स इन्व्हॉइस’ बनविणे अनिवार्य आहे, तसेच जर एका व्यक्तीच्या बिलाची रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा अधिक असेल व तो अनोंदणीकृत असेल, तर त्याला खरेदीदाराच्या बिलावर नाव, पत्ता, राज्य नमूद करणे अनिवार्य आहे, तसेच जर विक्रेत्याने अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडून खरेदी केले, तर त्याला त्याचाही ‘टॅक्स इन्व्हॉइस’ बनवावा लागेल. करदात्याला वस्तू विक्रीमध्ये बिलाच्या तीन प्रती काढाव्या लागतील. एक प्रत खरेदी करणाऱ्यासाठी, दुसरी प्रत ट्रान्सपोर्टरसाठी व तिसरी प्रत स्वत:साठी, तसेच सेवा देणाऱ्याने बिलाच्या दोन प्रती काढाव्यात, एक प्रत सर्व्हिस घेणाऱ्यासाठी व दुसरी प्रत स्वत:साठी ठेवावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, बिल आॅफ सप्लाय म्हणजे काय, हेही मला समजून सांग.
कृष्ण : अर्जुना, करदाता करमाफ वस्तूची विक्री करत असेल (म्हणजेच ज्या वस्तुंवर जीएसटीवर दर शून्य टक्के असेल) त्यांना अशा विक्रीवर बिल आॅफ सप्लाय बनवून द्यावा लागेल. टॅक्स इन्व्हॉइसमध्ये दिलेली सर्व माहिती जीएसटीचा दर व जीएसटीची रक्कम सोडून नमूद करावी लागेल.
अर्जंुन : कृष्णा, रीसिट व्हाउचर केव्हा बनवावे लागेल?
कृष्ण : अर्जुना, व्यवहारामध्ये जेव्हा अ‍ॅडव्हान्स रक्कम मिळेल, तेव्हा रीसिट व्हाऊचर द्यावे लागेल. अ‍ॅडव्हान्सवर जीएसटी आकारावा लागेल. टॅक्स इन्व्हॉइसमध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे, त्या रीसिट व्हाउचरमध्ये नमूद कराव्या लागतील.
अर्जुन : कृष्णा, डेबिट नोट व क्रेडिट नोट का व केव्हा लागेल?
कृष्ण : अर्जुना, करदात्याला टॅक्स इन्व्हॉइस जीएसटीएनवर अपलोड केल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. काही बदल किंवा दुरुस्ती करावयाची असल्यास ती डेबिट किंवा क्रेडिटनोटद्वारे करावी लागेल. यामध्ये टॅक्स इन्व्हॉइसमध्ये दिलेली सर्व माहिती नमूद करावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटी रिटर्न मध्ये बिलाची माहिती कशी द्यावी लागेल?
कृष्ण : अर्जुना, प्रत्येक करदात्याला करपात्र वस्तू किंवा सेवेचा विक्रीचा टॅक्स इन्व्हॉइस बनवून त्याची बिलवाइज माहिती जीएसटी रिटर्नमध्ये द्यावी लागेल. करमाफ वस्तू किंवा सेवा विक्रीची माहिती महिन्याची गोळा बेरीज करुन एकत्रितपणे देता येईल. जीएसटीचे रिटर्न दाखल केल्यानंतर या बिलामध्ये बदल करता येणार नाही. अनोंदणीकृत व्यक्तीला २.५ लाख रुपयांवर विक्री केल्यास, त्याची माहिती रिटर्नमध्ये नमूद करावी लागेल.

अर्जुन : कृष्णा, करदात्याने
यातून काय बोध घ्यावा?

कृष्ण: अर्जुना, जीएसटी हा अप्रत्यक्ष कर कायद्यातील सर्वात मोठा बदल आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काम करण्याचे स्वरूप बदलणार आहे. बदल ही काळाची गरज आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जीएसटी अनुरूप मानसिकता बदलणे आवश्यक ठरले आहे.

Web Title: Types of bills in GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.