lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्लाह यांच्या मृत्यूमुळे सौदीच्या तेल धोरणात बदल होण्याची शक्यता वाढल्यामुळे शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाली.

By admin | Published: January 24, 2015 01:29 AM2015-01-24T01:29:27+5:302015-01-24T01:29:27+5:30

सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्लाह यांच्या मृत्यूमुळे सौदीच्या तेल धोरणात बदल होण्याची शक्यता वाढल्यामुळे शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाली.

Increase in crude oil prices | कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

सिंगापूर : सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्लाह यांच्या मृत्यूमुळे सौदीच्या तेल धोरणात बदल होण्याची शक्यता वाढल्यामुळे शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाली. बदलत्या परिस्थितीतही राजे अब्दुल्लाह यांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्यास नकार दिला होता. त्यामुळे अतिरिक्त साठे निर्माण होऊन किमती आणखी घसरल्या होत्या.
सौदीच्या राजदरबाराने राजे अब्दुल्लाह यांच्या मृत्यूची घोषणा केल्यानंतर न्यूयॉर्क येथील बाजारात अमेरिकेचा बेंचमार्क असलेल्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट तेलाच्या मार्च डिलिव्हरीसाठीच्या दरांत ३.१ टक्क्यांनी वाढ झाली.
सकाळच्या सत्रात आशियाई बाजारातही तेलाचे भाव वाढले. सुमारे ७३ सेंट अथवा १.५८ टक्के अशी वाढ झाल्यानंतर कच्चे तेल ४७.0४ डॉलर प्रतिबॅरल झाले.
ब्रेंट क्रूड तेलाच्या मार्चसाठीच्या सौद्यांत १.0९ ते २.२५ डॉलरची वाढ झाली. त्याबरोबर या तेलाच्या किमती ४९.६१ डॉलरवर पोहोचल्या.
जागतिक पातळीवर तेलाची कमजोर मागणी आणि अतिरिक्त पुरवठा यामुळे कच्च्या तेलाचे भाव गेल्या सहा महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून सातत्याने घसरत आहेत. या घसरणीला पहिल्यांदाच ब्रेक लागला आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल १00 डॉलरपेक्षाही अधिक होत्या. नंतर त्या घसरणीला लागल्या. नोव्हेंबर महिन्यात तेल निर्यातदार देशांची (ओपेक) बैठक झाली. या बैठकीत तेलाच्या उत्पादनात कपात करण्याची शक्यता फेटाळण्यात आली. ओपेक संघटनेत सौदी अरेबियाचे वर्चस्व आहे. सौदीच्या दबावामुळेच तेल उत्पादनात कपात करायची नाही, असा निर्णय ओपेकने घेतल्याचे मानले जात होते.
राजे अब्दुल्लाह बिन अब्दुल अजीज यांच्या जागी राजपुत्र सलमान यांची निवड करण्यात आली आहे. सलमान हे ७९ वर्षांचे आहेत. सौदीच्या तेलमंत्रीपदी १९९५ पासून अली अल-नियामी हे कायम आहेत. सौदी नवे राजे नियामी यांना बदलतात की कायम ठेवतात, यावर आता बाजाराच्या नजरा आहेत.

सध्याचे त्यांचे एकत्रित उत्पादन ३0 दशलक्ष बॅरल आहे. नोव्हेंबरच्या ओपेक बैठकीत काही सदस्य देशांनी तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तथापि, आपला बाजारातील हिस्सा कायम ठेवण्यासाठी सौदीने हा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नव्हता.
जगातील काही तज्ज्ञांच्या मते सौदी अरेबियाने तेलपुरवठा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण बदलेल अशी सध्याची स्थिती नाही.

ओपेक संघटनेत सौदी अरेबियासह १२ देशांचा समावेश आहे. जगात वापरल्या जाणाऱ्या तेलापैकी ४0 टक्के तेल ओपेक संघटनेतील देश उत्पादित करतात.

Web Title: Increase in crude oil prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.