A new high of the index due to buying support | खरेदीच्या पाठबळामुळे निर्देशांकांचे नवे उच्चांक

- प्रसाद गो. जोशी 

गुंतवणूकदारांकडून सातत्याने लाभत असलेले पाठबळ, मूडीजने दर्जा वाढविल्याने अधिक प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता, वित्तसंस्थांची सातत्यपूर्ण खरेदी यामुळे बाजारात गतसप्ताह तेजीचा ठरला. सप्ताहामध्ये बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी नोंदविलेले नवे उच्चांक हे या सप्ताहाचे वैशिट्य मानावे लागेल. युरोप आणि अमेरिकेतही तेजीचे वातावरण असल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्र जोरात राहिले.
मुंबई शेअर बाजारातील सप्ताहाचा प्रारंभ वाढीव पातळीवर झाला. बंद निर्देशांकापेक्षा वाढीव पातळीवर खुल्या झालेल्या संवेदनशील निर्देशांकाने सप्ताहामध्ये ३३७३८.५३ ते ३३२८८.२१ अंशांदरम्यान हेलकावे घेतले. सप्ताहाच्या अखेरीस तो ३३६७९.२४ अंशांवर बंद झाला. सप्ताहात त्यामध्ये ३३६.४४ अंश म्हणजेच एक टक्कयाने वाढ झाली. दरम्यान या निर्देशांकाला गाठलेला नवा उच्चांक सप्ताहाच्या अखेरीपर्यंत कायम राखता आला नाही.
राष्टÑीय शेअर बाजारातही सप्ताह तेजीचा राहिला. येथील निर्देशांक (निफ्टी)ने १०४०० अंशांचा टप्पा गाठला, मात्र त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने सप्ताहाच्या अखेरीस तो १०३८९.७० अंशांवर बंद झाला.मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये १०६.१० अंशांनी वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांकही अनुक्रमे २६०.९९ आणि ४१९.४२ अंशांनी वाढले.
तत्पूर्वी या दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे १६९३७.२७ आणि १८०६४.५४ अशा नवीन उच्चांकांची नोंद केली आहे.
मागील सप्ताहात मुडीजने भारताच्या पतमानांकनामध्ये वाढ केल्यानंतर गतसप्ताहात एस
अ‍ॅण्ड पी कडूनही भारताच्या मानांकनात वाढ केली जाण्याची हवा बाजारात होती. त्याच आशेवर
बाजार वर जात होता. मात्र
शुक्रवारी एस अ‍ॅण्ड पी ने अशी वाढ करण्यास नकार दिला. याचा
फटका बाजाराला आगामी सप्ताहामध्ये बसू शकतो. अमेरिका आणि युरोपमधील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चांगला राहणार असल्याच्या अंदाजाने तेथील
बाजार तेजीत होते.

नोंदणीकृत आस्थापनांपैकी ३३ टक्के बंदच

- देशातील एकूण नोंदणीकृत आस्थापनांपैकी सुमारे ३३ टक्कयांहून अधिक आस्थापना या बंद असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाला आढळून आले आहे. या आस्थापनांपैकी काहींचा वापर काळा पैसा लपविण्यासाठी होत असण्याची शक्यताही मंत्रालयाने व्यक्त केली असून याबाबतची तपासणी सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
- ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी देशातील नोंदणीकृत आस्थापनांची संख्या १७ लाख ४ हजार ३१९ एवढी आहे. यापैकी ११ लाख ३० हजार ७८४ आस्थापना या कार्यरत आहेत. ५ लाख ३४ हजार ६७४ आस्थापना या बंद असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
- कार्यरत आस्थापनांपैकी सर्वाधिक ३.३४ लाख सेवा क्षेत्रातील असून २.३० लाख उत्पादन, १.५० लाख व्यापार तर १.०३ लाख आस्थापना बांधकाम क्षेत्रामधील असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.