The best tool for the city to be an electric scooter | इलेक्ट्रिक स्कूटर असेल शहरांसाठीचे सर्वोत्तम साधन

सोपान पांढरीपांडे
नागपूर : निती आयोगाने नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन ‘प्लॅन -२०३०’अन्वये २०३०पर्यंत सर्व वाहने बॅटरीवर चालविण्याची योजना आखली आहे. त्यामुळे लिथियम-आयर्न बॅटरीवर चालणारी स्कूटर ही शहरी प्रवासासाठी वाहन म्हणून पुढे येणार आहे, अशी माहिती हीरो इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल यांनी दिली.
‘लोकमत’शी बोलताना मुंजाल म्हणाले की, सध्या ३१ छोट्या-मोठ्या कंपन्या दरवर्षी ४० ते ४५ हजार इलेक्ट्रिक स्कूटर बनवतात. त्यात आमचा वाटा ६५ टक्के आहे. येत्या पाच वर्षांत या वाहनांच्या किमती घटतील व मागणी दुप्पट होईल. मुंजाळ म्हणाले की, या स्कूटर्स मुख्यत: लीड अ‍ॅसिड बॅटरीवर चालतात. परंतु जगभर लिथियम-आयर्न बॅटरी वापरली जाते. पाच वर्षांपूर्वी लिथियम-आयर्न बॅटरीची किंमत लीड अ‍ॅसिड बॅटरीहून साडेतीनपट अधिक होती. आज घट होऊन किंमत अडीचपट झाली आहे. पाच वर्षांनी ती लीड अ‍ॅसिड बॅटरीच्या किमतीत मिळू लागेल. इलेक्ट्रिक स्कूटरला इंजीन नसल्याने प्रदूषणकारी धूर नाही. देखभाल, दुरुस्ती खर्च नाही व प्रति किलोमीटर खर्च पेट्रोल स्कूटरच्या १० टक्क्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटरच बाजारात राहील.
सरकारने प्रवासी वाहतुकीसाठी ई-रिक्षाला मान्यता दिली आहे. पण अनेक राज्यांचा त्यास विरोध आहे, तो दूर होण्याची व शहरांतर्गत माल वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना मान्यता देण्याची गरज आहे. सरकारने फास्टर अ‍ॅडॉप्शन अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग आॅफ ई-व्हेइकल्स इन इंडिया प्रकल्प हाती घेतला आहे. पण त्यात अनेक धोरणात्मक बदल आवश्यक आहेत. त्यासाठी सोसायटी आॅफ मॅन्युफॅक्चरर्स आॅफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स कार्यरत आहे. नवीन मुंजाल त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत.


Web Title: The best tool for the city to be an electric scooter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.