चाळेन, पण टच करणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 04:41 AM2018-02-25T04:41:27+5:302018-02-25T04:41:27+5:30

‘मोडेन पण वाकणार नाही’ याप्रमाणे ‘चाळेन पण टच करणार नाही,’ असे काहीसे वर्तन पुस्तकांच्या बाबतीत मराठी वाचकांचे आणि प्रकाशकांचे दिसते. एखादे पुस्तक डिजिटल स्वरूपात वाचण्यापेक्षा, त्याची प्रत विकत घेऊन वाचण्याकडे मराठी वाचकांचा ओढा आजही कायम आहे.

 To run, but not to touch! | चाळेन, पण टच करणार नाही!

चाळेन, पण टच करणार नाही!

- प्रशांत ननावरे

‘मोडेन पण वाकणार नाही’ याप्रमाणे ‘चाळेन पण टच करणार नाही,’ असे काहीसे वर्तन पुस्तकांच्या बाबतीत मराठी वाचकांचे आणि प्रकाशकांचे दिसते. एखादे पुस्तक डिजिटल स्वरूपात वाचण्यापेक्षा, त्याची प्रत विकत घेऊन वाचण्याकडे मराठी वाचकांचा ओढा आजही कायम आहे. अर्थात, त्याला फक्त वाचक नाही, तर प्रकाशक आणि वितरकांची संपूर्ण यंत्रणाही जबाबदार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

मराठी ही मातृभाषा असली, तरी इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. मराठी जनही इंग्रजीच्या आहारी जाण्याला आता काळ लोटून, पुन्हा मराठीकडे वळण्याची कशी गरज आहे, यावर तावातावाने चर्चा करण्याचा सध्याचा काळ, पण केवळ चर्चा करून काहीच साध्य होणार नाही, हे आपण सर्वच जाणतो. लोकांना डिजिटल होण्यासाठी प्रोत्साहित करायचे असेल, तर स्थानिक भाषांना पर्याय नाही, हेदेखील आता सिद्ध झाले आहे. हे इतर सोईसुविधांप्रमाणे वाचन संस्कृतीला लागू पडते, पण मराठी प्रकाशक त्याचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. डिजिटल होण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे केवळ बफरिंगच सुरू आहे, असे दिसते.
मराठी प्रकाशक आणि वितरकांनी डिजिटल माध्यम अद्याप पुरतं समजून घेतलेले नाही. पुस्तकांची आॅनलाइन विक्री करणे, म्हणजे डिजिटल होणे नाही. मातृभाषा मराठी असलेली अनेक मंडळी प्रथम प्राधान्य इंग्रजी पुस्तकांना देतात. याचे एक कारण ती सहज उपलब्ध असणे. त्यामुळे संपूर्ण पुस्तक वेगवेगळ्या पर्यायांसह डिजिटल स्वरूपात किंडलसारख्या उपकरणांवर किंवा अँड्रॉइड अ‍ॅपवर वाचकांना एका टचवर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. डिजिटल पोर्टलवर त्यांची प्रभावीपणे आणि सतत जाहिरात करणे, या गोष्टींचाही त्यात समावेश होतो.
कुठलेही मराठी पुस्तक बाजारात येताना, आजही ते केवळ छापील स्वरूपातच प्रकाशित केले जाते. नव्या पिढीतील वाचकांपर्यंत पोहोचायचे असेल, तर एकाच वेळी ते डिजिटल स्वरूपातही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शिवाय मराठी पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम आॅनलाइन का केले जात नाहीत? वर्षभरापूर्वी ६ प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी रिडर’ हे अ‍ॅप सुरू केले, पण आजही नियमितपणे मराठी पुस्तके वाचणाºयांनाही त्याचा पत्ता नाही, यातच सर्वकाही आले.
मराठी पुस्तकांचे डिजिटल बस्तान वाढवायचे असेल, तर सर्वप्रथम प्रकाशकांनी मराठी वाचकांचे पुस्तकांच्या संदर्भातले मानसशास्त्र समजून घेतले पाहिजे. जोवर सर्व प्रकारचे मार्केट काबीज करून, वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, तोपर्यंत डिजिटल मराठी पुस्तकांना ‘अच्छे दिन’ येणार नाहीत.

Web Title:  To run, but not to touch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी