प्लॅस्टिकबंदी हा शाश्वत उपाय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 03:41 AM2018-04-15T03:41:15+5:302018-04-15T03:41:15+5:30

Plastic ban is not a permanent remedy |  प्लॅस्टिकबंदी हा शाश्वत उपाय नाही

 प्लॅस्टिकबंदी हा शाश्वत उपाय नाही

googlenewsNext

- डॉ. डी.डी. काळे

आजच्या युगाला प्लॅस्टिक युग म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या जीवनात प्लॅस्टिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्थानिक पातळीवरील वापरापासून मोठमोठ्या कंपन्या व मशिनरीपर्यंत प्लॅस्टिक अनिवार्य झाले आहे. विविध साहित्यांचा वापर करत विविध प्रकारचे प्लॅस्टिक बनवले जाते आणि प्लॅस्टिकचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. याच प्रकारांपैकी एक आहे, ते पॉलिइथीलिन टेरेफ्थॅलेट (पीईटी). स्थानिक पातळीवर या पॉलिमरचा अधिक प्रमाणात वापर केला जातो.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरकारच्या उद्देशांचे आम्हाला कौतुकच आहे. मात्र पीईटी बाटल्यांवर बंदी हा शाश्वत उपाय नाही. पीईटी बाटल्या स्वस्त व सर्वात सोयीस्कर प्लॅस्टिकपैकी एक आहेत. पीईटी ही शंभर टक्के पुन्हा वापरण्यास योग्य व पर्यावरण अनुकूल आहे.
पीईटी हे फूड कॉन्टॅक्टसाठी अत्यंत सुरक्षित आहे. पीईटीच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणत्याही अवजड धातू किंवा बिस्फेनॉल-ए(बीपीए)चा समावेश नसतो. जागतिक आरोग्य संघटनेने ‘फूड सेफ्टी : वॉट यू शुल्ड नो एप्रिल २०१५’ या अहवालामध्ये फूड कॉन्टॅक्टसाठी पीईटी सुरक्षित असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच पीईटीला औषधांच्या पॅकेजिंगसंदर्भात त्याच्या सुरक्षिततेसाठी जागतिक स्तरावरील यूएस एफडीए, यूएस फार्माकोपिया, इंडिया फार्माकोपिया अशा विविध वैद्यकीय संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. पीईटीमधून कोणतीही घातक रसायने पाझरत नाहीत आणि औषधांमधील मूळ तत्त्व कायम राखले जाते.
घोषित करण्यात आलेल्या बंदीची अंमलबजावणी जूनपासून सुरू होणार आहे. अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या पर्यायी विकल्पांची व्यवहार्यता तपासणे काळाची गरज आहे. सर्वात मुख्य विकल्प म्हणजे काच म्हटले जात आहे. मात्र काच हा पीईटीसाठी सर्वात शाश्वत पर्याय आहे का, हे तपासण्याची गरज आहे. कारण काच नाजूक असल्यामुळे ती सहज तडकते व त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. तसेच काचेचे तुकडेदेखील घातक ठरू शकतात. काचेचे सूक्ष्म कण असलेल्या बाटलीमध्ये औषध ठेवले आणि ते औषध व्यक्तीने घेतल्यास शरीरात सूज येणे, रक्ताच्या गाठी तयार होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय काचेचा पुनर्वापर करायचा असल्यास कोणताही संसर्ग होऊ नये, यासाठी काच निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. काचेच्या बाटल्यांचा एक केस स्वच्छ करण्यासाठी वीस लीटर पाणी लागते. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करूनही बाटली शंभर टक्के निर्जंतुक झाल्याची खात्री मिळत नाही. ज्यामुळे विशेषत: मुलांमध्ये पोटाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
हे सर्व घटक पाहता, पीईटी बाटल्यांवरील बंदीबाबत गांभीर्याने विचार करण्याची आणि पर्यावरणाच्या ºहासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कोणत्याच साहित्याचा बेजबाबदारपणे वापर केला नाही, तर पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते. या स्थितीसाठी समाजाला जागृत करणे आणि कचरा फेकल्याचे दुष्परिणाम आणि पुनर्वापराचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करणे हाच उत्तम उपाय आहे. सरकार व प्रशासनाने जागरूकता निर्माण करण्यासोबतच सामान्य व्यक्ती वापरू शकतील, असे शाश्वत व वाजवी कचरा व्यवस्थापन पर्याय दाखल करण्यात मुख्य भूमिका बजावली पाहिजे.
लेखक प्राध्यापक व रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) येथे पॉलिमर आणि प्लॅस्टिक तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख होते.

Web Title: Plastic ban is not a permanent remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.