Ovi Gaou Science! | ओवी गाऊ विज्ञानाची!

- अ. पां. देशपांडे

सुश्लोक वामनाचा, आर्या मयुरपंताची, ओवी ज्ञानेशाची, अभंग तुक्याचे हे वचन मराठी वाचकांना नवीन नाही. हे वचन ऐकताच डोळ्यापुढे ज्ञानेश्वर - तुकारामांच्या मूर्ती तरळून जातात, पण म्हणून कोणा सूटबूट घालणा-या वैज्ञानिकाने शास्त्रज्ञाची चरित्रे जर ओवीबद्ध लिहिली, तर आश्चर्याने एखाद्याचे बोट तोंडात जाणे सहज शक्य आहे. ओव्या लिहिणे एखाद्याला सहज शक्य नाही. त्यासाठी तुकारामांच्या कायेतच प्रवेश करायला हवा आणि आपले रोजचे सगळे पूर्ण वेळाचे आणि जबाबदारीचे व्यवहार सांभाळत, डॉ. पंडित विद्यासागर यांनी हे केव्हा केले, ते एक गूढच वाटते, पण वैज्ञानिकांची चरित्रे ओव्यांत लिहिणे हीसुद्धा एक नवी तंत्रभाषा आहे.
आजवर जगभरातल्या अनेक वैज्ञानिकांची चरित्रे जगभरातल्या सगळ्या भाषातून लिहिली गेली आहेत. ती वेगवेगळ्या वयोगटांच्या वाचकांसाठी लिहिली गेली आहेत. चरित्र नायक तोच असतो, पण वाचकाला पेलेल अशी भाषा आणि मजकूर निवडावा लागतो. बालकांसाठी चरित्र लिहिताना, हसत- खेळत वापरलेली भाषा ही जशी गरज असते, तसेच त्यातील मजकूर हा त्या चरित्र नायकाच्या बालपणातील गमती-जमती सांगणारा असावा लागतो. चरित्र नायक लहानपणी कसा हूड होता, शाळेच्या अभ्यासात कसा कच्चा होता, शिक्षकांची बोलणी कशी त्याला खावी लागत असत, तू पुढे एक वाया गेलेला माणूस होशील, अशी शिक्षकांची भविष्यवाणी पुढे कशी खोटी ठरली आणि तो एक जगप्रसिद्ध वैज्ञानिक झाला वगैरे तपशील त्यात यावा लागतो.
‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या पुस्तकात ७१ वैज्ञानिकांची चरित्रे दिली असून, त्यात २८ भारतीय वैज्ञानिक, तर ४३ वैज्ञानिक पाश्चात्त्य आहेत. भारतीय वैज्ञानिकांत जसे चरक, सुश्रुत, वराहमिहीर, भास्कराचार्य यासारखे जुने वैज्ञानिक आहेत, तसेच जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भाटकर यांसारखे आधुनिक आणि हयात असलेले वैज्ञानिकही आहेत. ज्या लोकांनी लावलेल्या शोधांमुळे समाजाचे जीवन सुलभ झाले, अर्थपूर्ण झाले, अशी ही वैज्ञानिक मंडळी आहेत. या प्रत्येक वैज्ञानिकाचा फोटो आणि चरित्र या पुस्तकात दिले आहे. पुस्तक २२१ पानांचे असून, ते पुण्याच्या डायमंड पब्लिकेशनने छापले आहे. यातील काही ओव्या अशा आहेत.

सुश्रुताबद्दलच्या ओव्या
अशा आहेत,
मानवी काया अभ्यासिली ।
हाडांची संख्या मोजिली ।
मोतीबिंदू, क्लिष्ट प्रसवकाळी ।
शल्यक्रिया शोधिली ।।
व्रण, जखम, अन्य घाव ।
दुर्लक्षिता निर्मिती स्राव ।
उपायाविना घेती जीव ।
सांगा सावधान वर्तावे ।।
भूल आणि शल्य प्लॅस्टिक ।
म्हणती यांचे जनक ।
सुश्रुतांचे शल्य गमक ।
आजही विशारद अभ्यासिती ।।
कुष्ठरोग विद्रुप करी
नासिका-हात ।
दुर्लक्षिता बाधित ।
शल्यवैद्य उपयोजिती नित ।
शल्यपद्धती सुश्रुताची ।।

न्यूटनचे नियम ओव्यात असे वर्णिले आहेत,
पृथ्वीमाजी आकर्षण बल ।
आकर्षी वस्तूंना सकल ।
गुरुत्वाकर्षण नाव राहील ।
निश्चय त्याने केला हा ।।
वस्तूमधील अंतराच्या ।
व्यस्त प्रमाणात तयाच्या ।
गुणाकारी वस्तुमानाच्या ।
बल त्याच्या सप्रमाणात ।।
गुरुत्वाकर्षण बल कसे काढावे ।
वस्तुमानांना गुणावे ।
त्यास दोन्हीतील
अंतरवर्गाने भागावे ।
बल त्या प्रमाणात असे ।।

आणि जयंत नारळीकर,
मूळ विश्वाच्या निर्मितीचे ।
महास्फोट म्हणूनी साचे ।
जगामध्ये मान्यतेचे ।
झेंडे आहेत रोवले ।।
परी त्याहूनी वेगळा विचार ।
करिती जयंत नारळीकर ।
त्यांच्या सिद्धांताचे सार ।
स्थिर स्थितीमाजी सामावले ।।
फ्रेड हॉयल - नारळीकर सिध्दांत ।
नाही सहजी मान्य होत ।
न डगमगता तोंड देत ।
विचार पुढे नेतसे ।।
तरुणपणी सिध्दांत मांडला ।
खूप प्रसिद्धी मिळे त्याला ।
नारळीकरांच्या प्रतिभेला ।
देती लोक मान्यता ।।
विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात ।
क्रांतिकारी बदल घडवीत ।
मराठी भाषेच्या समृद्धीत ।
आणखी भर घातली ।।
विज्ञानाचा प्रसार केला ।
आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला ।
वैभवशाली परंपरेला ।
पुनर्जीवन मिळाले ।।
आयुकाची स्थापना केली ।
कल्पकतेने विस्तारिली ।
संशोधना प्रेरित केली ।
फळी नवयुवकांची ।।
खगोलशास्त्रीय अभ्यास ।
ललाटभूत भारतास ।
प्रेरित करिती छात्रांस ।
संशोधन करण्यासी ।।