करिअरसाठी जगणं? की जगण्यासाठी करिअर घडवणं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:33 AM2018-06-03T01:33:16+5:302018-06-03T01:33:16+5:30

नेमक्या कोणत्या करिअरची निवड करायची हा सध्या घराघरांत चर्चिला जाणारा विषय आहे. करिअरकडे बघताना केवळ पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहावे, की अन्यही काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात...

Living for a career? How to make a career in life? | करिअरसाठी जगणं? की जगण्यासाठी करिअर घडवणं?

करिअरसाठी जगणं? की जगण्यासाठी करिअर घडवणं?

- श्याम मानव

नेमक्या कोणत्या करिअरची निवड करायची हा सध्या घराघरांत चर्चिला जाणारा विषय आहे. करिअरकडे बघताना केवळ पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहावे, की अन्यही काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात... अशाच वेगळ्या पैलूंना स्पर्श करणारा विशेष लेख खास लोकमतच्या वाचकांसाठी....

जीवनात जगण्यासाठी प्रत्येकाला अर्थार्जन करणं नितांत गरजेचं आहे. नोकरीचं क्षेत्र निवडणार असू तर समाजात, व्यवस्थेत उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधीचा विचार करावा लागतोच. उपलब्ध संधी आणि आपली आवड एक त्र आली तर आवडीच्या क्षेत्रात नोकरी उपलब्ध होऊ शकते. मनापासून मेहनतीनं काम करून प्रगतीची नवी नवी दालनं पादाक्रांत करता येतील. अर्थार्जन आणि आवड यांचा सुरेख संगम साध्य होऊ शकेल.
पण आवडीच्या क्षेत्रात नोकरीच्या संधीच उपलब्घ नसतील तर..? दोन पर्याय आहेत. १) जे होईल ते होईल पण मी माझ्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करणार, असा निश्चय करून त्याच क्षेत्रात धडपड करत राहणं. कष्ट करत करत त्या क्षेत्रात स्वत:ची योग्यता, कौशल्य क्षमता विकसित करणं. त्या क्षेत्रात उत्तम बनण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यातून व्यवसाय निर्माण करणं. अर्थार्जन प्राप्त करणं. या मार्गानं संगीत, चित्रकला, अभिनय, गायन, छायाचित्रण, खेळ अशा अनेक क्षेत्रांत कालांतरानं उत्तम यश, नावलौकिक आणि पैसाही मिळविलेले अनेक जण मी गेल्या ३० वर्षांत पाहत आलो आहे. सुरुवातीला यातील अनेकांवर समाजानं नकारात्मक शेरे मारले होते. पण तेच लोक आता मात्र त्यांच्या यशाचं कौतुक करताना दिसतात. अर्थात हा मार्ग प्रवाहाच्या विरुद्धचा असल्यामुळे प्रचंड मेहनत घ्यावी लागते.आवडीच्या क्षेत्राबाबत झपाटलेपण असावं लागतं. आत्मविश्वास, प्रचंड मेहनत, सतत कौशल्य योग्यता वाढवण्याची धडपड या मार्गानं अनेकांनी आकाशाला गवसणी घातली आहे.
२) दुसरा मध्यम मार्ग - काहींनी जरा वेगळी वाट चोखाळली. कुटुंबाची गरज, आईवडिलांची जबाबदारी यापोटी निर्माण झालेली निकड लक्षात घेऊन ज्या क्षेत्रात सहज नोकरीची संधी उपलब्घ आहे असं शिक्षणाचं क्षेत्र निवडलं. त्यात आवश्यक तेवढी पात्रता प्राप्त करून नोकरी पत्करली. नोकरी अर्थार्जनासाठी, स्वत:ला कुटुंबाला जगवण्यासाठी केली. नोकरीच्या वेळा नीट पाळायच्या, आवश्यक तेवढं (पाटी न टाकता) चांगलं काम करायचं. पण उर्वरित वेळ आणि बाकी सारी एनर्जी क्षमता आपल्या आवडीच्या कामात झोकून द्यायची. त्यातील कौशल्य, योग्यता विकसित करत राहायचं; आणि ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी नोकरी सोडून आवडीच्या क्षेत्रात पूर्णत: वाहून घ्यायचं. हाही मार्ग अनेकांना आयुष्याचं समाधान देऊन गेला. विशेषत: काही वर्षांपूर्वी टी.व्ही. मालिका, मराठी चित्रपट यात अभिनयाची आजच्या एवढी संधी नव्हती. पण काहींना मराठी नाटकं मात्र करायची होती. नाटकात कुटुंब चालण्याइतपत पैसा नव्हता. त्या वेळी अनेक नटांनी हा मार्ग चोखाळला होता. आज सगळ्याच क्षेत्रांत खूप स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालं आहे. त्याचे काही उत्तम फायदेही आहेत. त्यातून नव्या क्षेत्रात संधीही निर्माण झाल्या आहेत, होताहेत. सगळ्याच क्षेत्रांचं व्यवसायीकरण होत असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात अर्थार्जनाच्या संधीही उपलब्ध होताहेत. कधी नव्हे ती प्रत्येकाच्या व्यक्तिगत क्षमतेला, योग्यतेला, कौशल्याला उत्तम संधी निर्माण झाली आहे.
मी विद्यार्थी असण्याच्या काळात सत्तर-ऐंशीच्या दशकात शैक्षणिक क्षेत्रातील डिग्री फार महत्त्वाची असायची. डिग्री मिळाली की त्याआधारे नोकरी मिळायची. कामगार संघटना असल्यामुळं योग्यता असो नसो आयुष्यभर ती व्यक्ती नोकरीला चिकटून राहायची.
पण आता तसं नाही. सरकारी नोकरी वगळता इतर सर्व ठिकाणी (डिग्रीच्या आधारावर कदाचित) नोकरी मिळविता येते. पण ती टिकविण्यासाठी मात्र तुमची योग्यता क्षमता सिद्ध करावी लागते. आवश्यक असणारं आऊटपूट द्यावं लागतं. अन्यथा नोकरी गमवावी लागते.
आजच्या काळात गुणांना क्षमतेला कौशल्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. मूठभरांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. डिग्रीचं महत्त्व कमी झालं आहे. एक पायरी (स्टेपिंग स्टोन) यपलीकडे डिग्रीला महत्त्व उरलं नाही.
ज्ञान कौशल्य प्राप्तीचं एक साधन डिग्री व औपचारिक शिक्षण असू शकतं. पण आजच्या काळात महाविद्यालयाबाहेरही उत्तम ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याच्या शेकडो संधी उपलब्ध झाल्या आहेत. ज्ञानाची तहान असणारा माणूस कुठूनही ज्ञान प्राप्त करू शकतो, कौशल्य विकसित करण्याची संधी प्राप्त करू शकतो. फारसे पैसे खर्च न करतासुद्धा, एकलव्यासारखी शिकण्याची क्षमता वापरून, माहिती जालाचा (इंटरनेट) उपयोग करून, उत्तम विद्यार्थी योद्धा स्वत:त घडवू शकतो. एका बाजूनं आज प्रचंड स्पर्धात्मक वातावरणामुळं सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या, तरुणाच्या मनावर असुरक्षिततेचं जीवघेणं दडपण आहे. आई-वडिलांच्या, आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षांचं ओझंही आहे. या वातावरणामुळं ओझं अधिकाधिक वाढावं अशाच गोष्टी भोवताली घडताहेत. त्यात त्या त्या क्षेत्रात यशस्वी झालेले प्रसिद्ध लोक मार्गदर्शन करतात. आम्ही कसे यशस्वी झालो हे सांगतानाच कष्टाचे, मेहनतीचे प्रचंड डोंगर पार केल्याशिवाय यशस्वी होता येत नाही.
यश मिळणं ही कठीण गोष्ट हे कळत-नकळत या कोवळ्या मनांवर व आईबापांच्या मनावरही बिंबवतात. आज विद्यार्थ्याचे आईबाप दोघंही मुलांचं भविष्य, करिअर घडविण्याच्या चिंतेनं ग्रासलेले आहेत. त्यासाठी महागडे क्लासेस, महागडं शिक्षण, मोठ्या कॉलेजात प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी धडपडताहेत. प्रवेश मिळाला तर समाधानाचा सुस्कारा सोडताहेत. नाहीतर, आईबापही प्रचंड अस्वस्थ होताहेत. आपण कुठेतरी कमी पडतो या जाणिवेनं खंतावताहेत. आईबाप पालक खरंच मुलांचं पाहिजे तसं करिअर घडवू शकतात? विशिष्ट क्लास, विशिष्ट गुरू, करिअर घडवू शकतो?
करिअर घडविण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी करिअर घडवायचं? आपलं आयुष्य अतिशय सोपं आहे. छान आनंदानं जगता येतं. क्षण न् क्षण आनंदानं जगता येतो. करिअर घडवताना, कष्ट करतानाही आनंदानं जगता येतं. आनंदानं जगत करिअर घडवा. करिअरमध्ये यश आलं तरी आनंदी व्हाल! अपयशी झालात तरी उत्तम वाटचाल केलीत म्हणून आनंदी व्हाल!सतत असुरक्षित, धोकादायक जीवन जगत आलेला माझ्यासारखा माणूस सांगतो आहे. जीवन सोपं आहे. छान सहज आनंदानं जगता येण्यासारखं आहे. कसं? पुढे पाहू!

(लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि संघटक असून व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भातील कार्यशाळा घेण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.)

 

Web Title: Living for a career? How to make a career in life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.