लाइफमेट... एकमेकांना समजून घेण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:07 AM2018-02-11T01:07:55+5:302018-02-11T01:08:19+5:30

वधू-वर मेळाव्यातील एका जुजबी भेटीतच बोलून स्थळ पसंद करणे म्हणजे पारंपरिक पद्धतीने मुलीला पाहण्यापेक्षा फार काही वेगळे नाही. कारण एकमेकांना जाणून घेणे हा भाग त्यात कितपत साध्य होतो, याबाबत साशंकताच आहे.

Lifetime ... to understand each other | लाइफमेट... एकमेकांना समजून घेण्यासाठी

लाइफमेट... एकमेकांना समजून घेण्यासाठी

- विद्या गोगटे

वधू-वर मेळाव्यातील एका जुजबी भेटीतच बोलून स्थळ पसंद करणे म्हणजे पारंपरिक पद्धतीने मुलीला पाहण्यापेक्षा फार काही वेगळे नाही. कारण एकमेकांना जाणून घेणे हा भाग त्यात कितपत साध्य होतो, याबाबत साशंकताच आहे.

लाइफ पार्टनरला समजून घेण्याची, जाणून घेण्याची सर्वांत योग्य वेळ म्हणजे लग्नाआधीचीच. कारण लग्नाआधी एकमेकांना समजून न घेतल्यानेच पुढील वैवाहिक आयुष्यात अनेक जोडप्यांवर निराश होण्याची वेळ ओढवते. अनोळखी मुलीला पाहून आपली पसंती वा नापसंती कळवणे ही आपल्याकडील पारंपरिक पद्धत. पण आता काळानुसार यातील या पद्धतीतील दोष प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. मुलामुलींच्या भावनांशीच खेळ करणारे हे दोष असल्याने आम्ही ‘लाइफमेट’ हा उपक्रम सुरू केला.
लाइफमेट ही संकल्पना आमच्या स्वत:च्या अनुभवातून तसेच तरुणाईशी संवाद साधल्यानंतर जन्माला आली. यात एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे अनेकांना विवाहाआधी आपल्या जोडीदाराला नीट समजून घेण्यात उणीव राहिली. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून कालांतराने अनेक विवाहित जोडप्यांमध्ये सहजीवनाचा अभाव आढळतो. आणि हे चित्र पाहून विवाहइच्छुक मुला-मुलींच्याही मनात प्रचंड गोंधळ उडतो.
यामुळे सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेने आम्ही लग्नइच्छुक मुला-मुलींना त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे ठरवले. लाइफमेट ही अशी संकल्पना आहे की ज्यात विवाहइच्छुक मुले आणि मुली एकमेकांना पुन्हा पुन्हा (एका ग्रुपमध्ये) भेटून आणि एकत्र वेळ घालवून एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घेऊन आपला भावी जोडीदार योग्य प्रकारे निवडू शकतात. आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आधीच एकमेकांना योग्य प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच सर्वसामान्यपणे चालणाºया वधू-वर मेळाव्यांपेक्षा लाइफमेट उपक्रम वेगळा ठरतो. एकूणच लाइफमेट ही एक सामाजिक चळवळ होऊन लोकांच्या वैवाहिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकेल, असं स्वप्न लाइफमेटची टीम पाहात आहे.

लाइफमेट उपक्रमात आम्ही प्रसन्न वातावरणात मुलामुलींची भेट घडवून आणतो. अर्थातच या भेटी ग्रुपमध्ये होत असल्याने त्यांना कुठल्याही प्रकारचा संकोच वाटण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. सहजीवनाबाबत मार्गदर्शन करणारे समुपदेशक, डॉक्टर अशा तज्ज्ञ व्यक्तीही त्या मुला-मुलींशी संवाद साधतात. त्यांचा संभ्रम, गैरसमज दूर करतात. वैवाहिक जीवन कसे जबाबदारीने, एकमेकांना समजून घेऊन पार पाडले पाहिजे याची जाणीव त्यांना त्याचवेळी होते; आणि लग्नगाठी बांधल्या जातात. त्यामुळे अशा पद्धतीने विवाह जुळवणे हा आनंददायी अनुभव ठरतो.

Web Title: Lifetime ... to understand each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई