BRTS system in Mumbai | बीआरटीएस प्रणाली मुंबईत राबवाच

- सुधीर बदामी

शहरातील एकंदरीत नियोजनाचा अभाव असलेल्या वाहतुकीसंदर्भात अखेर न्यायालयाला विचार मांडावे लागले. लोकांमध्ये जनजागृतीसाठी ‘नो व्हेइकल डे’ उपयोगी ठरेल, परंतु त्यामुळे वाहतूककोंडीवर, वाहतुकीच्या नियोजनावर फरक पडेल, असे वाटत नाही. अशा उपायांपेक्षा शहरातील ज्या भागांमध्ये रस्त्याची योग्य व्यवस्था नाही, अरुंद रस्ते आहेत, अशा भागांमध्ये शासकीय वाहतूक प्रणालीव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश देणे बंद करावे. दक्षिण मुंबईतील काळबादेवी, भुलेश्वर, क्रॉफर्ड मार्केट, चिराबाजार अशा परिसरांना ‘कार फ्री एरिया’ घोषित करायला हवे. या भागात खरेदी व इतर कामांसाठी फिरणा-या लोकांसाठी वेळेची मर्यादा ठरवावी, जेणेकरून या भागात मनुष्यकोंडी होणार नाही, तसेच ‘बस रॅपिड ट्रझिंट सीस्टिम’ (बीआरटीएस) प्रणालीदेखील मुंबईत राबवावी. त्यामुळे लोक सार्वजनिक वाहतूक प्रणालीकडे वळतील. परिणामी, वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल.
शहरात वाहनतळांची वानवा असल्याने रस्त्यांच्या दुतर्फा, नो पार्किंग झोनमध्ये, मोकळी जागा मिळेल, त्या ठिकाणी लोकांनी अनधिकृत वाहनतळे उभी केली आहेत. त्यामुळे शहरे बकाल होत आहेत. अंडरग्राउंड पार्किंग, दुमजली, तीनमजली पार्किंग असे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी, वाहतूककोंडी वाढेल. त्यामुळे कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उचललेले पाऊल कोंडी वाढविण्यासच कारणीभूत ठरेल. शहरातील अनधिकृत पार्किंगवर कारवाई होणे आवश्यक आहे. शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येवर प्रशासनाचा अंकुश असायला हवा. तसे झाल्यास शहरातील वाहतूक प्रणाली सुधारण्यास मदत होईल.
मुंबईतील रेल्वेचा वापर क्षमतेपेक्षा दुप्पट लोक करतात. त्यामुळे रेल्वेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी रेल्वे अपघातात ३ हजार ५०० पेक्षा जास्त लाकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे रेल्वेला पर्यायी व्यवस्था मिळावी, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मोनो व मेट्रोपेक्षा अस्तित्वात असलेली बेस्ट वाहतूक प्रणालीदेखील उत्तमच आहे, परंतुु बेस्टसाठी उत्तम नियोजनाची गरज आहे. शहरातील वाहतूककोंडीवर ‘बस रॅपिड ट्रान्झिस्ट सीस्टिम’ (बीआरटीएस) वरदान ठरू शकते.
पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. मुंबईत २०० किलोमीटर लांबीची बीआरटीएस उभारता येऊ शकते. मुंबईत मेट्रो सुरू होण्यासाठी काही वर्षे जातील, त्यासाठी लागणारा खर्चदेखील अवाढव्य आहे. त्याउलट कमी खर्चात आणि कमी वेळेत रेल्वेला पर्याय ठरेल, अशी बीआरटीएस उभारता येईल. बीआरटीएसमुळे खासगी वाहतुकीपेक्षा सार्वजनिक वाहतूक सुरळीत व वेगवान होईल. त्यामुळे लोकांचा खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतुकीकडे कल वाढेल. जनजागृतीशिवाय वाहनांची संख्या कमी होईल, वाहतूककोंडी, वाहनतळांचे प्रश्न मार्गी लागतील. म्हणून बीआरटीएस प्रणालीचा प्रशासनाने विचार करावा. आपत्कालीन परिस्थितीतदेखील बीआरटीएस वाहतूक प्रणाली उपयोगी पडेल. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलीस प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीत बीआरटीएसचा वापर करता येईल. लोकांचा खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतुकीकडे कल वाढेल.

(लेखक हे वाहतूक तज्ज्ञ आहेत.)


Web Title: BRTS system in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.