माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:49 PM2024-04-27T18:49:10+5:302024-04-27T18:55:56+5:30

Himachal Lok Sabha Election 2024: कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्या इतर राज्यांमध्ये देखील भाजपचा प्रचार करत आहेत. रामपूरमधील झाकरी येथे प्रचारसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

कंगना म्हणाल्या की, जेव्हा मला भारतीय जनता पक्षाने मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी खालच्या पातळीवर टीका केली. मंडीमध्ये माझा भाव काय आहे, अशीही टीका झाली. हा मंडी लोकसभा मतदारसंघातील महिलांचा अपमान आहे. मी श्वास घेत आहे हे देखील काँग्रेसला त्रासदायक आहे. काँग्रेस नेते मी परिधान केलेल्या कपड्यांवरून मला लक्ष्य करत असतात.

तसेच बॉलिवूडमध्ये काम केल्यामुळे काँग्रेसने मला अपवित्र म्हटले. मी चित्रपटसृष्टीत काम करून कमावलेल्या पैशातून ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या आपल्या बहिणीवर उपचार केले, असे कंगना यांनी सांगितले.

कंगना म्हणाल्या की, काँग्रेस नेते श्रीमंत घराण्यातील आहेत. त्यामुळे ते गरिबांचे हाल समजू शकत नाही. पण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः गरीब कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांना प्रत्येक संघर्ष माहित आहे. माता-भगिनींचा सन्मान म्हणून ३३ टक्के आरक्षण देण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे.

"पंतप्रधान केवळ महिला सक्षमीकरणावर बोलत नाहीत, तर महिलांनी देशाचे नेतृत्व करावे अशी त्यांची इच्छा आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत सध्या एकच महिला आमदार आहे, मात्र ३३ टक्के आरक्षणानंतर एकूण ६६ पैकी २२ महिला जिंकून विधानसभेत पोहोचू शकतील", असेही कंगना यांनी स्पष्ट केले

याशिवाय आजपर्यंत मी चित्रपटसृष्टीत स्वत:साठी काम केले आहे, पण आता जनहिताच्या कामात स्वत:ला झोकून देणार आहे. समाजसेविका म्हणून जनतेची सेवा करणार असल्याचेही कंगना यांनी सांगितले.

दरम्यान, २०२२ च्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा थोडक्यात पराभव झाला. अशा स्थितीत राज्याचेही नुकसान झाले. आता ही चूक जनतेने पुन्हा करू नये. मोदींच्या गॅरंटीवर आज संपूर्ण जगाचा विश्वास आहे. आपल्याला पंतप्रधान मोदींसोबत डावीकडे किंवा उजवीकडे नाही तर सरळ चालायचे आहे, असे कंगना यांनी आणखी सांगितले.