रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:02 AM2024-05-09T10:02:18+5:302024-05-09T10:03:33+5:30

रस्त्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ, शिळे अन्न खाणे टाळा, वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात.

avoid eating open street food after the mankhurd incident the municipality woke up;system alert in mumbai | रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क

रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क

मुंबई: रस्त्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ, शिळे अन्न खाणे टाळा, वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. उघड्यावरील व निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधेच्या घटना घडतात, ही बाब लक्षात घेत, सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मानखुर्दमध्ये शोरमा खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईतील नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने विविध धोरणे, योजना आणि अभियान पालिकेच्या माध्यमातून नियमितपणे राबविण्यात येतात. ऋतुनिहाय आजारांची जनजागृती आणि उपाययोजना याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून नियमितपणे पाठविण्यात येते. वाढलेले तापमान व त्यातून अन्न पदार्थांवर होणारे परिणाम आणि अलीकडे घडलेल्या अन्न विषबाधेच्या घटनेच्या अनुषंगाने महानगरपालिका आरोग्य विभागाकडून मुंबईतील नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत.

नागरिकांना आवाहन-

रस्त्यांवरील, उघड्यांवरील खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असून योग्य पद्धतीने साठविलेले नसल्याचे निदर्शनास येते. वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अन्न विषबाधेसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. महानगरपालिका क्षेत्रातील पी उत्तर आणि एम पूर्व विभागामध्ये उघड्यावरील खाद्यपदार्थातून अन्न विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विषबाधा जीवावर बेतू शकते, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात येत आहे.

ही घ्या काळजी : अनधिकृत विक्रेत्यांकडून पेय आणि खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे, शक्यतो घरात शिजवलेले, ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. घरातील चांगले अन्न खावे. मुलांच्या पालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

फेरीवाल्यांवर बडगा-

१) मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेच्या 'एम पूर्व विभागाच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कारवाई केली. या मोहिमेअंतर्गत एकूण १५ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

२) या कारवाई अंतर्गत भाजीपाला, फेरीवाल्यांचे बाकडे आणि स्टॅण्ड असे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी दोन पोलिस कर्मचारी तसेच पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांसह आठ कामगारांचा आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

३) कारवाईनंतर परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला. याआधीही 'एम पूर्व' विभागाच्या माध्यमातून या परिसरात सातत्याने कारवाई करण्यात आली होती.

४) काही नागरिकांनी या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारी केल्या होत्या.

Web Title: avoid eating open street food after the mankhurd incident the municipality woke up;system alert in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.