भाजपला मुरगावात २० हजारांची आघाडी; काँगेसकडूनही विरियातोंच्या विजयाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 10:18 AM2024-05-10T10:18:50+5:302024-05-10T10:20:19+5:30

तीनही आमदारांनी केला विश्वास व्यक्त.

bjp has a lead of 20 thousand in murgaon in goa lok sabha election 2024 | भाजपला मुरगावात २० हजारांची आघाडी; काँगेसकडूनही विरियातोंच्या विजयाचा दावा

भाजपला मुरगावात २० हजारांची आघाडी; काँगेसकडूनही विरियातोंच्या विजयाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : लोकसभा निवडणुकीसाठी मुरगाव तालुक्यात ७२.११ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली असून ८२ हजार १९ पैकी मतदारांनी कोणाच्या बाजूने मतदान केले असावे त्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांतील भाजप आमदारांनी दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेपे यांना मुरगाव तालुक्यातून २० हजारांहून जास्त मतांची आघाडी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरीयेतो फर्नाडिस यांचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते मुरगाव तालुक्यातून मतांची आघाडी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत असून कोणाला आघाडी मिळणार ते ४ जूनला निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगाव अशा चारही मतदारसंघांतील १ लाख १३ हजार ७३२ मतदारांपैकी ८२ हजार १९ मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर तर्क-वितर्क काढले जात आहेत. मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांतून पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले असून ४१ हजार ५८९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, तर ४० हजार ४३० पुरुषांनी मतदान केले.

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांपैकी मुरगाव मतदारसंघातून सर्वांत जास्त ७४.१० टक्के मतदान झाले. येथील २० हजार १३४ मतदारापैंकी १५ हजार ६० मतदारांनी हक्क बजावला. मुरगाव तालुक्याच्या वास्को मतदारसंघातून सर्वांत कमी ६८.४१ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. येथील ३५ हजार ८८७ मतदारांपैकी २४ हजार ८४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दक्षिण गोव्यात वास्कोतून सर्वांत कमी असे ६८.४१ टक्के मतदान झाल्याने त्याबाबत चर्चा होत असली तरी गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत वास्को मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

दाबोळी मतदारसंघात ७२.६६ टक्के मतदान झाले असून येथील २६ हजार ३६७ मतदारांपैकी १९ हजार २९८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. कुठ्ठाळीतील ३१ हजार ३४४ मतदारांपैकी २३ हजार १०६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ७२.१६ टक्के मतदानाची नोंद झाली. एकंदरीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांतून ७१.११ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.

मागील काही लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहिल्यास मुरगाव तालुका भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दिसून आले असून मागील काही निवडणुकीत येथून भाजपला चांगली आघाडी मिळाली होती. यंदाही भाजपला मुरगाव तालुक्यातून मोठी आघाडी मिळणार असल्याचा दावा भाजप नेते-कार्यकर्त्यांनी करण्यास सुरुवात केली आहे.

मुरगाव मतदारसंघाचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर आणि पंचायतमंत्री तथा दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्या दाव्यानुसार मुरगाव तालुक्यातून दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धंपे यांना २० हजारांहून जास्त मतांची आघाडी मिळेल. भाजप नेते-कार्यकर्ते त्यांना मुरगाव तालुक्यातून मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा करत असून दुसऱ्या बाजूने काँग्रेस नेते, कार्यकर्ते मुरगाव तालुक्यातून काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा करीत आहेत.

मुरगाव मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी ८० टक्के मतदान भाजप उमेदवार पल्लवी धंपे यांना होणार असा आजही माझा विश्वास आहे. मी घेतलेल्या आढाव्यानुसार मुरगाव मतदारसंघात झालेल्या १५ हजार ६८ मतांपैकी भाजपला ११ ते १२ हजार मते मिळणार. मुरगाव मतदारसंघातून भाजपला ७ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळणार. - संकल्प आमोणकर, आमदार, मुरगाव मतदारसंघ.

हजार २९८ जणांनी मतदान केले असून त्यापैकी दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना १२ हजारांहून जास्त मते मिळणार असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे. दाबोळीत झालेल्या मतदानाबाबत मी तपशीलरीत्या अभ्यास केला असून येथे भाजप उमेदवाराला ६ हजारांची आघाडी मिळणार, असे मला वाटते. - माविन गुदिन्हो, पंचायतमंत्री आणि दाबोळीचे आमदार.

वास्को मतदारसंघातून दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना ७ ते ८ हजारांच्या मतांची आघाडी मिळणार, असा मला विश्वास आहे. वास्कोत २४ हजार ८४७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यापैकी १६ हजार मते भाजप उमेदवाराला मिळणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा वास्को मतदारसंघातून मतदानाची टक्केवारी वाढलेली असून ही गोष्ट भाजपसाठीच फायदेशीर आहे. - कृष्णा साळकर, आमदार, वास्को मतदारसंघ.

 

Web Title: bjp has a lead of 20 thousand in murgaon in goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.