वरळीत होणार 'मोदीदहन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 04:55 PM2018-03-01T16:55:56+5:302018-03-01T16:55:56+5:30

'होळी रे होळी पुरणाची पोळी' असे म्हणत दरवर्षी होळीचा उत्सव साजरा होतो. आजही होळीचा सण आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत घोटाळेबाज नीरव मोदी आणि पीएनबी बँकेच्या प्रतिमेचे दहन केले जाणार आहे.

वाईट प्रथा, वाईट रुढी यांचे अग्नीत दहन करून चांगल्याच्या निर्मिती व्हावी अशी प्रार्थना होळीच्या दिवशी केली जाते. तोच उद्देश समोर ठेवून पीएनबी बँकेला चुना लावून पळालेल्या नीरव मोदीच्या ५० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावून नीरव मोदी देशाबाहेर पळाला. त्याला त्याचा मामा आणि व्यवसायातील सहकारी मेहुल चोक्सीनेही साथ दिली. विजय मल्ल्यापेक्षाही मोठा कर्जबुडव्या नीरव मोदी ठरला त्यामुळेच लोकांच्या मनात त्याच्याबद्दल संताप आहे. पीएनबीच्या अधिकाऱ्यांनीही नीरव मोदीला साथ दिली. त्यामुळे ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या पीएनबीवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे.

बीडीडी चाळीतील या इमारतीतर्फे दरवर्षी होलिका उत्सव साजरा करताना देशात किंवा राज्यात घडलेल्या घटनांची थीम होळी पेटवताना साकार केली जाते. याआधी नोटाबंदीचा निर्णय, कर्जबुडव्या विजय मल्ल्या, कसाब यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांचे दहनही या ठिकाणी करण्यात आले आहे.

ग्रँटरोडच्या पंचशील सोसायटीमध्येही एक आगळीवेगळी होळी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. याठिकाणी 'हुक्क्याची' प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हुक्का पार्लरमुळे कमला मिलमध्ये आग लागली आणि त्याचे सेवनही शरीराला अपायकारक असते.