By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:53 IST
1 / 9पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये, यासाठी महापालिकेने विविध भागांत टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू केली आहे. मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदीतून ३१ मेपर्यंत तब्बल 9 लाख मेट्रिक टन गाळ उपसण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत केवळ चार टक्के गाळउपसा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.2 / 9पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून नाले, गटारे आणि मिठी नदीची सफाई करते.3 / 9मागील वर्षी मिठी नदीसह नालेसफाईसाठी दोन वर्षांचे कंत्राट दिले होते. मात्र, मिठी नदी सफाईच्या कामातील घोटाळा उघडकीस आला. 4 / 9या प्रकरणाची चौकशी सुरू असून, काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. परिणामी यंदा वेळेत नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. मात्र आता ही कामे जोरात सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.5 / 9नाल्यांतील गाळ काढण्याच्या कामाची इत्थंभूत माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी प्रशासनाने पालिकेच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर छायाचित्रे, चित्रफिती उपलब्ध करून दिल्या आहेत.6 / 9नाल्यातून गाळ काढल्यानंतर गाळाची तत्काळ वाहतूक सुरू करावी जेणेकरून 'डॅशबोर्ड'वर त्याची माहिती तत्काळ प्रदर्शित होईल. तसेच नागरिकांना वास्तविक वेळेत (रिअल टाइम) प्रगती पाहता येईल, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहेत.7 / 9कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे यंदा उशिराने म्हणजे १४ मार्चपासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. मागील १४ दिवसांत कंत्राटदारांकडून विविध नाल्यांतून जवळपास ३२ हजार ६९३ मेट्रिक टन (चार टक्के) गाळ उपसला आहे.8 / 9मुंबईतील नालेसफाई मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदी अशा तीन टप्प्यांत होते. मिठी नदीसाठी कंत्राटदार निश्चित झाले असून, तेथील गाळ उपसालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. गाळ उपसासाठी अद्ययावत यंत्रसामग्रीची मदत घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.9 / 9नाल्यांतून काढलेल्या गाळाची ४८ तासांत निश्चित ठिकाणी विल्हेवाट लावावी. आवश्यक त्या १४ ठिकाणी 'ट्रॅश बूम'चा वापर करावा. रेल्वे व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधावा. पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत व अखंड राहील, याची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.