जि.प. शिक्षकांच्या पदव्या बोगस!
By Admin | Updated: November 30, 2014 23:01 IST2014-11-30T23:01:09+5:302014-11-30T23:01:09+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींसह काहींच्या शैक्षणिक

जि.प. शिक्षकांच्या पदव्या बोगस!
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींसह काहींच्या शैक्षणिक पात्रतेत वाढ केली आहे. पण, यातील बहुतांशी शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडून अधिकृतरीत्या सुटी मंजूर करून न घेता बीएड, एमएड यासारख्या पदव्या प्राप्त केल्याचा आरोप काही शिक्षकांकडून केला जात आहे. यामुळे बोगस पदवीधर शिक्षकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
बोगस पदवी घेऊन काही शिक्षकांनी शिक्षण विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने काही मोजक्याच दप्तरांमध्ये
विविध स्वरूपाच्या नोंदी करून घेतल्या आहेत. पण, काही
महत्त्वाच्या दप्तरांमध्ये त्या नोंदी झालेल्या नसल्याचा शोध जिल्ह्यातील अन्यायग्रस्त शिक्षकांच्या एका गटाने लावला आहे. यामुळे
सेवा ज्येष्ठता असली तरी बोगस पदवीद्वारे मिळवलेली पदोन्नती जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
अन्याय झालेल्या शिक्षकांनी काही शिक्षक संघटनांच्या
माध्यमातून शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी करण्याचा प्रयत्न केला
आहे. पण, तो निष्फळ ठरला आहे. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट या शिक्षकांकडून घेतली जाणार आहे. त्यानंतरही गांभीर्याने विचार न केल्यास या शिक्षकांकडून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत.
तत्पूर्वी या शिक्षकांकडून बोगस पदवीद्वारे पदोन्नती घेतलेल्या शिक्षकांची इत्थंभूत माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
यामुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकपणाचे वाभाडे निघण्याची शक्यता असून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)