जि.प. कर्मचाऱ्यांची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: February 15, 2015 23:17 IST2015-02-15T23:17:53+5:302015-02-15T23:17:53+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून विकल्प घेण्यात आले असता सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी पालघरऐवजी ठाणे जिल्ह्यात येण्यास व राहण्यास संमती दिली आहे

जि.प. कर्मचाऱ्यांची मोर्चेबांधणी
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून विकल्प घेण्यात आले असता सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी पालघरऐवजी ठाणे जिल्ह्यात येण्यास व राहण्यास संमती दिली आहे. पण, एवढ्या कर्मचाऱ्यांना घेतल्यास पालघरला कर्मचारी शिल्लक राहणार नाही. यामुळे शासनाकडून अद्यापही मार्गदर्शन झाले नाही. परंतु, ठाण्यात बदलीसाठी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
याआधीच पोलिसांच्या बदल्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्यात विकल्प देऊन ही बदली न झाल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांचा पाठिंबा घेऊन ठाण्यात राहण्याचा किंवा बदली करण्याचा हट्ट करीत आहेत. पालघरमधून जाण्याची हीच एक संधी आहे. अन्यथा, या जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात येण्यासाठी यापुढे जिल्हा बदलीचे नियम लागणार आहेत. यात अडकण्यापेक्षा आताच काय ती शक्ती पणाला लावून विकल्पाप्रमाणे बदली करून घेण्यासाठी दोन्ही जिल्हा परिषदांचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील या ८० टक्के ठाण्यात राहण्याच्या विकल्पावर राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागितले आहे. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. मात्र, शासनाकडून अद्यापही मार्गदर्शन होत नसले तरी कर्मचारी मात्र विकल्पावर ठाम राहून बदलीसाठी सतर्क झाले आहेत. यामुळे दोन्ही जिल्हा परिषदांच्या संबंधित अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या शिफारशींना तोंड द्यावे लागत आहे. (प्रतिनिधी)