मुंबई - बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात जी चार्जशीट आहे त्यातून बिल्डर लॉबी, एसआरए अँगल बाहेर आला नाही. आम्ही यावर सहमत नाही. पूर्ण चार्जशीट वाचल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असं सांगत तपासावर माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
झिशान सिद्दिकी म्हणाले की, बिश्नोईने जर हे घडवून आणले असेल तर त्याने गुन्ह्याची कबुली दिलीय का? बिश्नोईच्या चौकशीत त्याने कुठल्या बिल्डरने मला हे करण्यास सांगितले नाही असं म्हटलंय का? हा माझा पोलिसांना प्रश्न आहे. आम्ही जबाबात सांगितलंय, बिल्डर लॉबीवर संशय व्यक्त केला आहे. चौकशीतून खरे बाहेर आले पाहिजे अन्यथा यापुढे काही झाले तर बिश्नोईच्या नावावर खपवले जाईल. तो देशात नाही. तो जेलमध्ये आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था सुधारणार नाही. या हत्या प्रकरणाच्या चौकशीवर आम्ही खुश नाही. प्रत्येक अँगलने याचा तपास झाला पाहिजे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. कायदेशीर बाबीही तपासून घेणार आहोत. आम्ही कोर्टात जाऊ. आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
त्याशिवाय सलमानला घाबरवण्यासाठी हे घडवले गेले असं अनमोल बिश्नोईने पोलिसांना सांगितले का, यातील मुख्य आरोपी अजून सापडले नाहीत. मग तुम्ही कशाप्रकारे तपास केला आणि निष्कर्ष लावला आहे. इतके महिने झाले मुख्य आरोपी सापडले नाहीत. कायदा सुव्यवस्था मुंबईत बिघडली आहे. आम्हाला जे जे संशय आहेत ते आम्ही पोलिसांना सांगितले आहेत. तपास कोणत्या अँगलने झालाय हे बघितले पाहिजे. संपूर्ण आरोपपत्र वाचलं पाहिजे. कोणत्या बिल्डरचा जबाब घेतला. चौकशी केली. कुठे तपास केला. कोणत्या पुराव्याद्वारे चौकशी केली हे तपासले पाहिजे असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, बिश्नोईने केले असेल तर त्याला भारतात का आणत नाही. बिश्नोईची चौकशी झाली आहे का, त्याने कुठल्याही बिल्डरने मला हत्या करायला सांगितली नाही असं म्हटलंय का..? चार्जशीट पूर्ण पाहिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. जर बिश्नोईने केले हे मान्य केले तर बिल्डरने सुपारी दिलीय की नाही हे पुढे आले का, कुठलीही गोष्ट पुढे आली नसताना निष्कर्ष कसा काढला जाऊ शकतो असा सवाल झिशान सिद्दिकी यांनी तपास यंत्रणेवर उपस्थित केला आहे.