Join us

झवेरी बाजार दरोडा प्रकरण; ओळखीच्या सराफानेच केला घात, तिघांना ठोकल्या गुन्हे शाखेने बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 06:39 IST

झवेरी बाजारातील कारखान्यात बुधवारी रात्री टाकलेल्या सशस्त्र दरोड्यामागे, ओळखीचाच सराफा व्यावसायिक असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

मुंबई : झवेरी बाजारातील कारखान्यात बुधवारी रात्री टाकलेल्या सशस्त्र दरोड्यामागे, ओळखीचाच सराफा व्यावसायिक असल्याचे तपासातून उघड झाले आहे. कारखान्यात दरोड्याच्या डाव रचणारा टिपर आणि व्यापारी जयरुल उर्फ पिंटू बाबर शेख (३४) याच्यासह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष २ ने ही कामगिरी केली आहे, तर अन्य ७ ते ८ साथीदारांचा शोध गुन्हे शाखेकडून सुरू आहे.झवेरी बाजारातील सोने कारागीर सौमण कारक (२६) यांचा शेख मेमन स्ट्रीटवरील सुतार चाळीच्या चौथ्या मजल्यावर दागिने घडविण्याचा कारखाना आहे. बुधवारी रात्री कारखान्यातील कारागिरांना बांधून ७ दरोडेखोरांनी ३६ लाखांची लूट केली. पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कक्ष २ ने या प्रकरणी समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे कक्ष २चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी अर्जुन जगदाळे, संतोष कदम, सचिन माने, प्रफुल्ल पाटील, सुनील मोरे, एकनाथ कदम, संजीव गुंडेवाड आणि अंमलदार विक्रांत मोहिते, आरिफ पटेल, राजेश ब्रिद, हदयनारायण मिश्रा, मनोजकुमार तांबडे, सूर्यकांत पवार, राजन लाड, रामचंद्र पाटील, प्रमोद शिर्के, राजेश सोनावणे, नामदेव पिल्ले यांची तीन पथके तयार केली.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू झाला. शिताफीने पोलिसांनी पिंटू शेखला अटक केली. त्यापाठोपाठ राहुल प्रदीप साळवी (२४), किरण उर्फ सोन्या किशोर तावडे (२८) या दोघांनाही बेड्या ठोकल्या. पिंटूच मास्टरमाइंड असल्याचे तपासात उघड झाले. कारकला मोठी आॅर्डर मिळाल्याचे समजताच पिंटूने दरोड्याची योजना आखली. ७ जण आत शिरले. हाती लागेल ते सोने घेऊन पळ काढला. अटक आरोपींच्या चौकशीत अन्य आरोपींची नावे हाती आली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :गुन्हाअटक