तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: December 1, 2015 04:12 IST2015-12-01T04:12:05+5:302015-12-01T04:12:05+5:30
जोगेश्वरी पूर्वेकडील कोकण सागर इमारतीवर बसविण्यात आलेले तीन टॉवर्स काढण्यास सोसायटीने नकार दर्शविला. शिवाय चौथा टॉवर बसविण्याचा तगादा लावला.

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील कोकण सागर इमारतीवर बसविण्यात आलेले तीन टॉवर्स काढण्यास सोसायटीने नकार दर्शविला. शिवाय चौथा टॉवर बसविण्याचा तगादा लावला. परिणामी, या विरोधात असलेले इमारतीमधील रहिवासी सुशील चिंदरकर यांनी स्वत:ला जाळून घेतल्याची घटना रविवारी घडली.
दुर्घटनेत ३० टक्के भाजलेल्या सुशील यांना भायखळ्यातील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोसायटीच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केले आहे, असा
आरोप चिंदरकर कुटुंबीयांनी केला आहे.
चिंदरकर कुंटुंबीय वास्तव्य करत असलेली कोकण सागर इमारत
सात मजल्यांची आहे. सुशील यांच्यासह त्याचा भाऊ नितीन,
दोन्ही भावांच्या पत्नी, तीन मुले आणि आई-वडील असे हे चिंदरकर कुटुंब सातव्या मजल्यावर वास्तव्य करत आहेत. इमारतीवर यापूर्वीच मोबाइलचे तीन टॉवर्स लावण्यात आले असून, येथे हे टॉवर्स
बसविण्यात येऊ नये, म्हणून त्यांनी विरोध दर्शविला होता.
शिवाय जेव्हा हे टॉवर्स बसविण्यासाठी इमारतीमधील रहिवाशांची स्वाक्षरी घेण्यात आली; तेव्हा चिंदरकर कुटुंबीयांनी स्वाक्षरी दिली नव्हती. महत्त्वाचे म्हणजे इमारतीवर आता ‘फोर-जी’साठीचा चौथा टॉवरही बसविण्यात येणार होता आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी या संदर्भात बैठकही झाली होती, परंतु सुशील यांनी ‘फोर-जी’चा चौथा टॉवर बसविण्यास विरोध केला होता, परंतु इमारतीमधील कोणीही त्यांना जुमानले नाही, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
वारंवार सोसायटीकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे सुशील यांनी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवर स्वत: जाळून घेतले. या घटनेची माहिती मिळताच, कुटुंबीयांनी त्यांना प्रथम जयकोच येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले, परंतु रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा सुशील यांना भायखळा येथील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्यापही त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
चिंदरकर यांचा नोंदवला जबाब
या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद शिंदे यांनी दिली. चिंदरकर यांचा जबाब नोंदवण्यात आला असून, मोबाइल टॉवरमुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून हे त्याने पाऊल उचल्याचे जबाबात सांगितले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
30% भाजलेल्या सुशीलला भायखळ्यातील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोसायटीच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केले आहे, असा आरोप चिंदरकर कुटुंबीयांनी केला आहे.