Join us

सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:04 IST

मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजचा बहुप्रतिक्षित वार्षिक महोत्सव 'मल्हार २०२५' नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला.

मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजचा बहुप्रतिक्षित वार्षिक महोत्सव 'मल्हार २०२५' नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या धमाकेदार उत्सवात तरुणाईच्या कला, विचार आणि ऊर्जेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विविध स्पर्धा, कार्यशाळा, खाण्यापिण्याचे स्टॉल्स आणि कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या असंख्य उपक्रमांनी हा परिसर पूर्णपणे भारून गेला होता.

कायदा आणि राजकारणावरील चर्चामल्हार २०२५ मध्ये आयोजित 'कॉनक्लेव्ह' सत्रांमध्ये कायदा आणि शासन यांसारख्या गंभीर विषयांवर सखोल चर्चा झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते-दरे उपस्थित होत्या. त्यांनी 'विशाखा मार्गदर्शक तत्त्वे', 'लैंगिक छळविरोधी कायदा' आणि 'ट्रान्सजेंडर हक्क कायदा' यांसारख्या महत्त्वाच्या कायद्यांनी समाजात कसा बदल घडवला, यावर प्रभावीपणे भाष्य केले. त्यांचे हे विचार यंदाच्या 'लहर – आजची तरंग, उद्याचा क्रांतीसूर' या मल्हारच्या संकल्पनेला साजेसे होते.

याच सत्रात खासदार सुप्रिया सुळे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "लोकशाहीत प्रत्येक मताला महत्त्व आहे," असे सांगत त्यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन' आणि मिझोरम-जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर आपले विचार मांडले. "आपण येथे सहमतीसाठी नाही, तर मतभेद व्यक्त करण्यासाठी आलो आहोत," असे सांगून त्यांनी मुक्त आणि विचारांच्या देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले. कॉनक्लेव्हचा शेवट अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या दमदार संवादाने झाला.

संगीत मैफिलीत तरुणाईचा धुमाकूळया उत्सवाचा समारोप कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या एका धमाकेदार संगीत मैफिलीने झाला. डीजे राजीव यांनी लोकप्रिय गाण्यांच्या रिमिक्सवर प्रेक्षकांना नाचायला लावले. त्यानंतर 'चार दिवारी' आणि त्यांच्या बँडने 'झाग', 'क्या' आणि 'फरेबी' यांसारख्या गाण्यांनी उपस्थितांना अक्षरशः वेड लावले.

या सर्व सोहळ्याची सांगता बक्षीस समारंभाने झाली, ज्यामध्ये 'सीसी टर्मिनस' या विभागाने विजेतेपद पटकावले. शेवटी मल्हार २०२५चा 'आफ्टरमूव्ही' प्रदर्शित झाला. यात गेल्या चार महिन्यांच्या तयारीचा आणि तीन दिवसांच्या अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव दाखवण्यात आला. कला, संगीत आणि विचारांची सांगड घालत मल्हार २०२५ ने पुन्हा एकदा भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवांपैकी एक म्हणून आपली ओळख पक्की केली.

टॅग्स :महाविद्यालयमुंबई