‘फ्रिक’मध्ये रंगली तरुणाई
By Admin | Updated: January 24, 2017 06:20 IST2017-01-24T06:20:09+5:302017-01-24T06:20:09+5:30
विद्यार्थीदशेत असताना अभ्यासाबरोबरच अन्य कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

‘फ्रिक’मध्ये रंगली तरुणाई
मुंबई : विद्यार्थीदशेत असताना अभ्यासाबरोबरच अन्य कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून भावना ट्रस्ट महाविद्यालयात फ्रिक या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
चेंबूर येथील भावना ट्रस्ट महाविद्यालयात सोमवारी ‘फ्रिक’ फेस्टची सुरुवात झाली. या फेस्टमध्ये मुंबईतल्या १५ महाविद्यालयांतून ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. फ्रिकच्या पहिल्या दिवशी मुला-मुलींसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट म्हणजे मुलांची मक्तेदारी समजली जाते. पण, येथे मुलींनी बॉक्स क्रिकेटचा आनंद लुटला. क्रीडा स्पर्धांबरोबरच वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर आपली मते मांडली.
या फेस्टमध्ये संस्कारभारती रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘ब्राईडल मेहेंदी’ या स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या फेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी विविध साहित्यातून सुंदर कलाकृती, मूर्ती आकारल्या.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अन्य गोष्टी शिकाव्यात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयीन महोत्सव आणि स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे महाविद्यालयाच्या समितीकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)