नायगाव येथे तरुणाची महिलेला मारहाण
By Admin | Updated: June 16, 2016 02:46 IST2016-06-16T02:46:36+5:302016-06-16T02:46:36+5:30
छेडछाड करताच विरोध करणाऱ्या महिला प्रवाशाला तरुणाने मारहाण केल्याची घटना नायगाव रेल्वे स्थानकात घडली. अन्य प्रवाशांकडून मात्र बघ्याची भूमिका घेण्यात आली. रेल्वे पोलिसांना हे

नायगाव येथे तरुणाची महिलेला मारहाण
मुंबई : छेडछाड करताच विरोध करणाऱ्या महिला प्रवाशाला तरुणाने मारहाण केल्याची घटना नायगाव रेल्वे स्थानकात घडली. अन्य प्रवाशांकडून मात्र बघ्याची भूमिका घेण्यात आली. रेल्वे पोलिसांना हे समजताच तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली.
मंगळवारी सकाळी ९.२५ च्या सुमारास ३५ वर्षीय महिलेने नायगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून दादरला जाणाऱ्या बारा डबा लोकलचा फर्स्ट क्लास महिला डबा पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेसोबत तीची आईदेखिल होती. मात्र ही लोकल सदर महिला पकडू शकली नाही. त्यामुळे मागून येणारी पंधरा डबा अंधेरी लोकल पकडून अंधेरी स्थानकात उतरुन त्यानंतर दादरला जाणारी लोकल पकडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार स्थानकात पंधरा डब्यांची अंधेरी लोकल येताच फर्स्ट क्लास महिला डबा पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र पंधरा डबा लोकल असल्याने त्या लोकलचा फर्स्ट क्लास महिला डबा हा विरारच्या दिशेने येत होता. त्यामुळे दोघीही डब्याच्या दिशेने धावू लागल्या. त्याचवेळी थांबलेल्या अंधेरी लोकलमधून एक २७ वर्षीय तरुण उतरला आणि समोरुन येणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अडवून विनयभंग केला. त्याला महिलेकडून प्रतिकार करण्यात आला आणि तीने तरुणाच्या शर्टाची कॉलर पकडली. महिलेचा रौद्रावतार पाहताच तरुणाने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)