Youth should refuse life, reject drugs! - Siddharth Jadhav | युवकांनी जीवनाला होकार, नशेला नकार द्यावा! - सिद्धार्थ जाधव
युवकांनी जीवनाला होकार, नशेला नकार द्यावा! - सिद्धार्थ जाधव

मुंबई : चित्रपटसृष्टीमध्ये मी स्वत: आजवर निर्व्यसनी असल्याचा मला अभिमान आहे. ड्रग्जमुळे लयाला चाललेली युवापिढी जतन करण्यासाठी युवकांनी सुदृढ आरोग्य बनवून, स्वत: व्यसनमुक्त होऊन सक्षम भारत निर्मितीच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले पाहिजे. युवकांनी जीवनाला होकार, नशेला नकार दिला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती बॅ्रण्ड अ‍ॅम्बेसिडर अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी केले.
जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त अमली पदार्थ नियंत्रक विभाग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सेवा योजना एसएनडीटी व मुंबई विद्यापीठ, समाजकल्याण आयुक्तालय, कदम फाउंडेशन, अखिल भारतीय नशामुक्ती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘से नो टू ड्रग्ज युवा मेळावा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात नुकताच पार पडला.
कार्यक्रमादरम्यान, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना ‘व्यसनमुक्ती नायक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. यावेळी व्यसनाच्या या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी युवापिढीने पुढाकार घेऊन कार्यरत राहण्याचे आवाहन राजकुमार बडोले यांनी केले, तसेच देशभरात ड्रग्जचे सेवन करणाऱ्या कमी-कमी होत चाललेल्या वयाबद्दल चिंता व्यक्त केली. पालकांना मुलांवरती लक्ष ठेवून त्यांच्याशी संवाद वाढवावा, असा संदेश सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिला.
युवा मेळाव्यात युवकांनी अमली पदार्थांच्या विरोधात एल्गार पुकारला. व्यसनाला या राज्यातून व देशातून हद्दपार करायचे असेल, तर व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेली साधने घेऊन एक चळवळ उभी करावी लागेल, अशा अनोख्या पथनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेलो, नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, नार्कोटिस्ट कंट्रोल ब्युरोचे संचालक उगम दान चरण आदींची उपस्थिती होती.

विविध चर्चासत्रांचे आयोजन
‘से नो टू ड्रग्ज’ म्हणत, उपस्थितांनी सेल्फी व ड्रग्जवरील संदेशाचे मुखवटे परिधान केले होते. ड्रग्जमुक्त संवेदनशील गीतांवर तरुणाई थिरकली. कार्यक्रमात ‘अमली पदार्थांचे प्रकार, कायदे, उपचार व पुनवर्सन’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले होते.

महाविद्यालयांना पुरस्कार
सिद्धार्थ महाविद्यालय, महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ठाकूर महाविद्यालय यांना ‘अमली पदार्थ मुक्त महाविद्यालय’ हा विशेष पुरस्कार सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

Web Title:  Youth should refuse life, reject drugs! - Siddharth Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.