लहानपणीची कुठली गोष्ट सगळ्यात जास्त 'मिस' करता?... तरुणाईला आठवले 'अच्छे दिन'

By सायली शिर्के | Published: November 14, 2019 04:27 PM2019-11-14T16:27:34+5:302019-11-14T16:36:34+5:30

काय गंमत असते ना... लहान असताना मोठं झाल्यावर कसं असणार याचं प्रचंड कुतूहल असतं आणि मोठं झाल्यावर बालपणाची खऱ्या अर्थाने किंमत कळते.

youth opinion about Children's Day and School life | लहानपणीची कुठली गोष्ट सगळ्यात जास्त 'मिस' करता?... तरुणाईला आठवले 'अच्छे दिन'

लहानपणीची कुठली गोष्ट सगळ्यात जास्त 'मिस' करता?... तरुणाईला आठवले 'अच्छे दिन'

Next

आईचं बोट धरून टाकलेलं पहिलं पाऊल, बोबडे बोल, पाटीवर गिरवलेली अक्षरं, चॉकलेटचा डब्बा, व्हिडीओ गेमचं अप्रूप, वहीचं शेवटचं पान, नव्या पुस्तकांचा सुगंध, बाईंना दिलेला त्रास, सरांना मारलेल्या थापा, हस्तलिखितासाठीची धडपड, क्रीडास्पर्धेच्या वेळी असलेला उत्साह, रुसवे-फुगवे, मधल्या सुट्टीतील धमाल मस्ती म्हणजे बालपण. काय गंमत असते ना... लहान असताना मोठं झाल्यावर कसं असणार याचं प्रचंड कुतूहल असतं आणि मोठं झाल्यावर बालपणाची खऱ्या अर्थाने किंमत कळते. 

प्रत्येकात एक लहान मुलं दडलेलं असतं असं म्हणतात पण आता घड्याळ्याच्या काट्यासोबत धावता धावता आम्ही त्याला शोधायलाचं विसरतो. पण हल्ली बालदिनी मात्र व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर आपल्या मुलांचे अथवा स्वत: बालपणीचे फोटो टाकून ती हौस भागवून घेण्याचा छोटासा प्रयत्न मात्र करतो. खोटं बोललं की देवबाप्पा कान कापतो, बाहेर जाऊ नको, लहान मुलांना पकडायला म्हातारी आलीय, अभ्यास केला नाही तर तुला बोर्डिंगमध्ये पाठवणार, बिया खाल्ल्या तर पोटात झाड येतं, अंधारात जाऊ नको बुवा (भूत) पकडेल अशा आई-बाबांनी दिलेल्या गोड धमक्या आजही भारीच वाटतात. बालपण देगा देवा, रम्य ते बालपण असं म्हणत सगळी मोठी मंडळी त्यावेळची धमाल-मस्ती थोडी मिस करतायत. लहानपणीचे भन्नाट अनुभव, नेमकं आता काय मिस केलं जातं हे जाणून घेऊया तरुणाईच्याच शब्दांत...


बालपण खरंच खूप भारी होतं. चिऊ-काऊच्या गोष्टी, भातुकली, लगोरी, लपाछपीसारखे खेळ, शाळेतील धमाल सगळंच मस्त होतं. आता कामात खूपच व्यस्त असल्याने मजा करायलाच मिळत नाही. मोकळा वेळ असतो कधी कधी हाताशी पण त्यातली गंमत गेली आहे. लहान असताना खूप जास्त लाड व्हायचे. 

- मृणाल चव्हाण 

लहाणपणी खूप खोड्या काढायला मिळायच्या. मोठं झाल्यावर अशी मस्ती करता येतं नाही. शाळेत असताना खेळाच्या तासाची आवर्जून वाट पाहायचो. परीक्षा नकोशा वाटायच्या पण आता त्यांचं महत्त्व आता कळतंय. हवं तसं वागता यायचं, लहान असल्याने जास्त ओरडा मिळायचा नाही. खूप कौतुक व्हायचं.

- वैभव पवार 


लहानपणीचं जग खूप वेगळं होतं. शाळेला सुट्टी कधी पडते याचीच प्रकर्षाने वाट पाहायचो. शाळेला सुट्टी म्हणजे अभ्यासाचं नो टेन्शन, खूप खेळायला मिळायचं. आजीकडे राहायला जायचो. तिथे धमाल करायचो. ताईसोबत भातुकली खेळायला फार आवडायची. आजही भातुकली खूप जास्त मिस करतेय. 

- रिद्धी विश्वासराव

लहान असताना भरपूर धमाल केली आहे. खूप वेळा खेळताना धडपडलो आहे. अजून ही लागलेल्या खूणा आहेत. लहान असतो तेव्हा मजा असते. आई-बाबांकडून सर्व हट्ट पूरवून घेता येतात. विविध प्रकारच्या गाड्या आणि गेम्सची आवड असल्याने घरात प्रचंड खेळणी होती. अभ्यासाचा कंटाळा यायचा पण परीक्षा जवळ आली की पुस्तक हातात घ्यावं लागायचं. 

- अजिंक्य शिंदे 


अभ्यासाचा कंटाळा केला आहे. लहानपणी आईचा खूप ओरडा आणि मार देखील खाल्ला आहे. घरातली मोठी माणसं रागावली की तेव्हा राग यायचा आणि रुसून बसायचो. शाळेच्या बाहेर मिळणारी चिंचा, बोरं, आवळा-सुपारी जास्त मिस करतेय. हवी तेवढी मस्ती करता यायची आता तसं करता येत नाही. 

- साक्षी पाटील 
 

Web Title: youth opinion about Children's Day and School life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.