Join us  

नायर हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणाचा कळस, एमआरआय मशिनमध्ये अडकून तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 9:17 AM

तो आपल्या बहिणीच्या सासूला बघायला नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. पेशंटचा त्यावेळी एमआरआय करायचा असल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने राजेशला एमआरआय रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचा असल्याचं सांगितलं...

मुंबई : मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणाचा कळस गाठल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजेश मारू या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. आपल्या बहिणीच्या सासूला एमआरआय करण्यासाठी घेऊन गेलेल्या राजेशचाच  एमआरआयच्या मशिनमध्ये खेचल्या गेल्यामुळे मृत्यू झाला. 

एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. राजेश मारू आपल्या बहिणीच्या सासूला बघायला नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. पेशंटचा त्यावेळी एमआरआय करायचा असल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने राजेशला एमआरआय रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचा असल्याचं सांगितलं.एमआरआय रूममध्ये धातूची वस्तू नेण्यास मज्जाव असतो. पण एमआरआय मशिन बंद  आहे त्यामुळे सिलेंडर आत नेण्यास हरकत नाही असं वॉर्डबॉयने त्याला सांगितलं. राजेश सिलेंडर आत घेऊन गेला. मात्र आतमध्ये मशिन सुरूच होत्या.

आतमध्ये जाताच  अचानक सिलेंडर सकट तो एमआरआय मशिनमध्ये ओढला गेला आणि सिलेंडरचा व्हॉल्व लीक होऊन ऑक्सिजन बाहेर येऊ लागला. राजेशचा हात एमआरआय मशिनमध्ये अडकला. अखेर कर्मचा-यांच्या सहाय्याने कसंबसं त्याला बाहेर काढण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान त्याला वाचवण्यात अपयश आलं आणि राजेशचा मृत्यू झाला.  

टॅग्स :हॉस्पिटलडॉक्टरमृत्यूमुंबई