सी-लिंकवरुन तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: January 25, 2015 01:09 IST2015-01-25T01:09:34+5:302015-01-25T01:09:34+5:30
वांद्रे-वरळी सी-लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

सी-लिंकवरुन तरुणाची आत्महत्या
मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवारी रात्री ऊशिरापर्यंत तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. परंतू अद्याप तो सापडलेला नाही.
भायखळा येथील खडा पारसी येथून तरुणाने शुक्रवारी मध्यरात्री टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसता क्षणी त्याने टॅक्सी चालकाला वांद्रे येथे जायचे असून, टॅक्सी सी-लिंकवरुन नेण्यास सांगितले. टॅक्सी सी-लिंकच्या मध्यभागी येताच त्याने चालकाला टॅक्सी थांबविण्यास सांगितली. शिवाय टॅक्सीच्या खिडकीतून डोके बाहेर काढत उलटी येत असल्याचा बहाणा करत तो टॅक्सीबाहेर आला. तसेच सी-लिंकच्या कडेला जात चार ते पाचवेळा उलटी करण्याचा बहाणा केला. आणि कालांतराने कडयावर चढून त्याने उडी मारली. सी-लिंकवरील घटनेनंतर तात्काळ अग्निशमल दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी हाती घेतलेले बचावकार्य शनिवारपर्यंत सुरु होते.
दरम्यान, सी-लिंक चौकी येथे रात्रपाळीला असलेल्या दोन पोलिसांनी टॅक्सी थांबल्याचे पाहिले, ती का थांबली? हे तपासण्यासाठी ते पुढे येत असताना तरुणाने उडी मारल्याचे टॅक्सीचालक मोहमद खान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२०१४
गेल्या वर्षात ९ जणांनी सी-लिंकवरुन उडी मारुन आपले जीवन संपविले.
नव्या वर्षात सी-लिंक वरुन उडी मारुन आत्महत्या ही पहिली घटना आहे. याप्रकाराला प्रतिबंध करण्याचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत.