Join us

तुमची दोन पुस्तके घडवतील विद्यार्थ्यांचे भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 06:37 IST

तरुणाचे आवाहन । गावातल्या ग्रंथालयासाठी साताऱ्यातील अजयची मुंबापुरीत धडपड

सचिन लुंगसे 

मुंबई : गावातल्या गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्यासाठीची पुस्तके त्यांना मोफत मिळावीत, यासाठी मूळचा साताºयाचा आणि सध्या नवी मुंबईत वास्तव्यास असलेला अजय दिलीप मोरे हा तरुण प्रयत्नशील आहे. साताºयातील पांडे गावात त्याने शंभर पुस्तकांचे मोफत ग्रंथालय सुरू केले आहे.

व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर असलेला अजय नवी मुंबईतल्या जुईनगरमध्ये राहतो. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडे हे त्याचे मूळ गाव. एकविसाव्या शतकातही अन्नपाण्यासाठी येथील गावकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गावात मराठी शाळा होती. मात्र, पटसंख्या नसल्याने ती बंद झाली आहे. अशा अवस्थेतही शिकून मोठे होण्यासाठी गावातील अनेक मुले धडपडत आहेत. यूपीएससी, एमपीएससीची परीक्षा देऊन भवितव्य घडविण्याचे स्वप्न पाहणाºया होतकरू मुलांना या परीक्षेसाठी लागणारी पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत, तसेच ज्ञानात भर घालणारी अन्य पुस्तकेही गावातील मुलांसह वाचनाची भूक असणाºया अबालवृद्ध सर्वांनाच उपलब्ध व्हावीत, यासाठी त्याने गावात मोफत ग्रंथालय सुरू केले आहे.कोणत्याही विषयाची दोन पुस्तके द्या, जी शैक्षणिक अभ्यासक्रमाची असतील किंवा ज्यात साहित्य असेल, प्रभावी विचार असतील, जी वाचल्यामुळे शिक्षणासाठी मदत होईल, ज्ञानात भर पडेल, वैचारिक बैठक प्रगल्भ होईल, सोबतच मनोरंजनही होईल, तुमची ही मदत अनेकांच्या जीवनाला उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवेल, असे आवाहन अजयने केले आहे.ग्रंथालयात येण्यासाठी वयाची अट नाही. ६५ वर्षांचा माणूसही येथे येतो. बुद्ध विहाराने जागा दिली आहे, तिथेच ग्रंथालय उभे आहे. ग्रंथालयात शंभर पुस्तके असून, इच्छुकांनी दोन पुस्तके दिली, तर ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या वाढून ती अबालवृद्ध सर्वांसाठी उपयुक्त ठरतील, असे मत त्याने व्यक्त केले आहे. आताचे ग्रंथालय छोटे आहे. मात्र, पुस्तकांसाठी येथे रकाने केले जात आहेत. त्यासाठी सप्तश्रृंगी सोसायटी, बिल्डिंग नंबर ८, खोली क्रमांक ३/१३, सेक्टर २५, जुईनगर येथे पुस्तके आणून देण्याचे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहनही त्याने केले आहे.‘वाचाल तरच वाचाल’‘वाचाल तरच वाचाल’, हा उज्ज्वल भवितव्याचा मूलमंत्र आहे. मी सिद्धार्थ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत दोन महाविद्यालये सुरू केली. एक बुद्ध भवन, दुसरे सिद्धार्थ महाविद्यालय. येताना तुम्ही राजा सिद्धार्थासारखे या आणि जाताना येथून ज्ञानाची प्राप्ती करून गौतम बुद्ध बना, असा बाबासाहेबांचा उद्देश यामागे होता. हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी, तसेच भारताची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी ग्रंथालयाच्या रूपात माझा छोटासा प्रयत्न सुरू आहे, असे अजय मोरे याने सांगितले.

 

टॅग्स :मुंबई