तुमचे फॅशन डिझायनर इथे गाळताहेत घाम...
By मनोज गडनीस | Updated: November 10, 2025 12:48 IST2025-11-10T12:47:38+5:302025-11-10T12:48:15+5:30
Dharavi News: धारावीच्या पोटात कपडे निर्मितीचे एक मोठे मार्केट वसलेले आहे. अरुंद गल्ल्यांत प्रकाशदेखील पोहोचणे जेथे मुश्कील, तेथे ५०० पेक्षा जास्त कपडे निर्मितीचे कारखाने धारावीमध्ये आहेत.

तुमचे फॅशन डिझायनर इथे गाळताहेत घाम...
- मनोज गडनीस
तुम्हाला माहिती आहे का, की एम्ब्रॉडरी केलेले, कलरफुल, वेगळ्या पॅटर्नचे, लेटेस्ट फॅशनचे जे कपडे तुम्ही खरेदी करता त्यातील किमान ४० टक्के कपड्यांची निर्मिती ही धारावीमध्ये होते? आता धारावी म्हटलं की केवळ कुंभारवाडा, लेदर मार्केट, सुका-मेवा, फरसाण एवढंच काय ते आपल्याला आठवतं. पण तसं नाही. धारावीच्या पोटात कपडे निर्मितीचे एक मोठे मार्केट वसलेले आहे. किमान ५०० पेक्षा जास्त कपडे निर्मितीचे कारखाने धारावीमध्ये आहेत. इथल्या कपडे निर्मितीच्या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जरदारी, हाताने केलेली जाणारी एम्ब्रॉडरी, फॅशलनेबल टी-शर्ट आणि जीन पॅन्टची निर्मिती हे इथले प्रमुख वैशिष्ट्य आहे. धारावीच्या अरुंद गल्ल्यात जिथे प्रकाशदेखील पोहोचणे मुश्कील आहे तिथे हे छोटेखानी कारखाने दिवसरात्र कपड्यांची निर्मिती करत असतात. त्यामुळे सातत्याने ट्यूबलाइटच्या प्रकाशात २४ तास मशीनची धडधड कपड्यांची वीण करत असते. १९९३च्या दंगलीनंतर प्रामुख्याने हा उद्योग बगिचा परिसरात वसला आणि मग विस्तारत गेला. कपड्यांची निर्मिती करणारे कारागीर हे प्रामुख्याने बिहार आणि तामिळनाडू येथील रहिवासी आहे. प्रत्येक कारखान्यातून दिवसाकाठी ५०० ते ६०० शर्ट अथवा जीन्सची निर्मिती होते. प्रत्येक कारागिराला दिवसाकाठी १५० ते २०० रुपये मिळतात. हाताने जरदारीचे काम करणाऱ्या कारागिराचे मानधन दिवसाकाठी २५० रुपयांपर्यंत जाते. हस्त जरदारीची कारागिरी प्रामुख्याने बिहारी लोक करतात.
त्यांच्याकडे परंपरागत ही कला आहे आणि त्यांनी ती पिढ्यान् पिढ्या जोपासली आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण कला आहे. एकदा कपडा तयार झाला की, त्याला इस्त्री करावी लागते. इस्त्री करणाऱ्या कारागिराला प्रत्येक कपड्याच्या इस्त्रीसाठी ३ रुपयांचा दर मिळतो. केवळ मुंबई आणि देशात नव्हे तर परदेशातदेखील येथे तयार होणाऱ्या कपड्यांना मोठी मागणी आहे.
सरत्या तीन दशकांत फोफावलेल्या या उद्योगाला मात्र कोविड काळात मोठे ग्रहण लागले. कोविडच्या दोन दशकात जवळपास ६० टक्के उद्योग कोलमडला. अनेकांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज झालं. एका व्यावसायिकाने सांगितलं की, माझे सर्वच कारागीर गावाला गेले. त्यातील केवळ ४० टक्के कारागीर परत आले. अजूनही कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे. पण या खेरीज अन्य कोणताही उद्योग मला येत नाही. त्यामुळे जगण्यासाठी सारे करावेच लागेल. कंबर कसून मी उभा आहे. लवकरच यातून मी बाहेर येईन. माझ्यासारखीच बाकीच्यांची परिस्थिती आहे. पण आम्ही मार्ग काढत आहोत. हा मार्ग काढताना आम्ही आमच्या कपड्यांच्या निर्मितीच्या गुणवत्तेत काहीही कॉम्प्रोमाइज करणार नाही. कारण आमच्या कपडे निर्मितीमध्ये एक वैशिष्ट्य आहे आणि ती आमची ओळख आहे अन् तीच आम्हाला जपायची आहे. बाकी नियती सांभाळून घेईल ।