यंगिस्तानने गाजवला शॉर्टफिल्म फेस्ट

By Admin | Updated: February 3, 2015 00:27 IST2015-02-03T00:27:00+5:302015-02-03T00:27:00+5:30

कलिना येथील मुंबई युनिव्हर्सिटी येथील फिरोझशहा मेहता भवन सभागृहात आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल पार पडला.

Youngest Shotfilm Fest in Bangladesh | यंगिस्तानने गाजवला शॉर्टफिल्म फेस्ट

यंगिस्तानने गाजवला शॉर्टफिल्म फेस्ट

रोहित नाईक - मुंबई
मुंबई युनिव्हर्सिटीचा कम्युनिटी रेडिओ १०७.८ मस्ट आणि सम्यक कलांश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच कलिना येथील मुंबई युनिव्हर्सिटी येथील फिरोझशहा मेहता भवन सभागृहात आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल पार पडला. नवोदित कलाकारांना आपली शॉर्टफिल्म प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी या वेळी केवळ स्क्रीनिंग करण्यात आले होते.
या दोनदिवसीय फेस्टमध्ये एकूण ४४ शॉर्टफिल्म्स दाखविण्यात आल्या. विशेष म्हणजे यंगिस्तानने अत्यंत कल्पकतेने सादरीकरण करताना सध्याच्या ज्वलंत विषयांवर उत्कृष्टरीत्या भाष्य केले. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाचे महत्त्व जाणून अनेकांनी आपल्या फिल्ममधून स्वच्छतेचा संदेश दिला. दखल घेण्याची बाब म्हणजे या फेस्टमध्ये सहभागी झालेले कलाकार हे सगळे कॉलेजियन्स असल्याने खऱ्या अर्थाने तरुणाईचा सळसळता उत्साह या वेळी दिसून आला.
अवघ्या २-३ मिनिटांची ‘डोनेशन बॉक्स’ फिल्म सर्वांनाच भावली. तराजूच्या एका पारड्यात रुपयांची भरगच्च देणगी मिळत होती, तर एका पारड्यात केवळ एक कागदी फॉर्म पडतो आणि त्या फॉर्मचे पारडे अचानकपणे जड होते. कारण तो फॉर्म नेत्रदानाचा असतो आणि येथेच उपस्थित सुमारे २०० हून अधिक प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटाने या कलाकृतीला दाद देतात.
लहान मुलांना शिक्षण दिल्यास देशाचे भविष्य घडेल, असा संदेश देणारा ‘आशाए’ ही कचरा वेचणाऱ्या लहान मुलांवर आधारित शॉर्टफिल्म देखील लक्ष वेधून घेणारी ठरली. तर ‘लव्ह जिहाद’ या नावानेच सर्वांची उत्सुकता ताणून घेणाऱ्या फिल्मने धार्मिक वादंगातून कशाप्रकारे समाज कलंकित होतो, यावर भाष्य करीत सर्वांना विचारात पाडले.
आजची पिढी ही सोशल नेटवर्कमध्ये बिझी असते. संवादाची विविध साधने हातामध्ये आली असली तरी माणसे ‘प्रत्यक्षात’ ते कोसो दूर असतात. हाच धागा पकडून ‘चॅट आॅन लेटर’ या फिल्ममधून पत्रव्यवहाराने संपर्कात राहून मनाने एकत्र राहण्याचा मोलाचा संदेश तरुणाईला मिळाला. तसेच निवडणुकीच्या काळात होणाऱ्या भ्रष्टाचारवर प्रकाश टाकणारा ‘बिर्याणी’ हा लघुपट सर्वांनाच भावला. (प्रतिनिधी)

आज सोशल नेटवर्कवर सर्वच जण कनेक्टेड आहेत, मात्र प्रत्यक्षरीत्या सगळेच डिसकनेक्टेड असतात. त्यामुळेच हा विषय निवडला. मी पहिल्यांदाच शॉर्टफिल्म बनवली आणि ती यशस्वी झाल्याचा खूप आनंद आहे.
- हितेश कल्याणकर
(चॅट आॅन लेटर, जोशी-बेडेकर कॉलेज)

यंदाच्या १५ आॅगस्टला कॉलेजमध्ये जाताना कचरा वेचणाऱ्या मुलांना पाहून वाईट वाटले. आपण स्वातंत्र्यदिनी पाहुण्यांची वाट पाहतो, मात्र अशा मुलांसाठी काहीच करीत नाही. या मुलांना शिक्षणाची संधी दिल्यास खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन साजरा होईल.
- आशुतोष गोरे (आशाए, अभिनव कॉलेज)

Web Title: Youngest Shotfilm Fest in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.