Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिष्ट प्रथेविरुद्ध काम करणाऱ्या तरुणांना संरक्षण देण्यात येईल - रणजित पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 19:43 IST

कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथेविरोधात समुपदेशन करुन सुधारणा करणाऱ्या या समाजातील सुशिक्षित तरुणांना आवश्यक ते संरक्षण देण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

 मुंबई : कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथेविरोधात समुपदेशन करुन सुधारणा करणाऱ्या या समाजातील सुशिक्षित तरुणांना आवश्यक ते संरक्षण देण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

रणजित पाटील पुढे म्हणाले, कौमार्य चाचणी करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारीवरुन पुणे पोलीस स्टेशनमार्फत चौकशी करण्यात आली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा विरुद्ध तक्रार करण्यास संघटना पुढे आल्यास त्यांना संरक्षण देण्यात येईल. तसेच याबाबत स्वयंस्फूर्तीने कार्यवाही करण्याबाबत पोलीसांना सूचना देण्यात येतील. कौमार्य चाचणीबाबत जाहीर वाच्यता केल्यास याबाबत गुन्हा नोंदविला जाईल व कार्यवाही करण्यासाठी सर्व पोलीस स्थानकांना सूचना देण्यात येतील. एका महिन्याच्या आत बैठक घेण्यात येवून दर तीन महिन्यांनी याबाबतचा आढावा घेण्यात येईल,महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंद, बंदी व निवारण) आदी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ही लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य डॉ. निलम गोऱ्हे यांनी मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य हेमंत टकले, विद्या चव्हाण, ॲड. हुस्नबानु खलिफे यांनी या लक्षवेधीच्या चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :मुंबई