प्रचाराच्या केंद्रस्थानी तरुणाई
By Admin | Updated: October 7, 2014 22:56 IST2014-10-07T22:56:18+5:302014-10-07T22:56:18+5:30
मतदारांत तरुणांची संख्या वाढली असल्याने आणि लोकसभा निवडणुकीत तरुणांनी बजावलेली भूमिका यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारात तरुणांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.
प्रचाराच्या केंद्रस्थानी तरुणाई
सिकंदर अनवारे, दासगांव
मतदार नोंदणी अभियानातून एकूण मतदारांत तरुणांची संख्या वाढली असल्याने आणि लोकसभा निवडणुकीत तरुणांनी बजावलेली भूमिका यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारात तरुणांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रचाराच्या केंद्रस्थानी एकंदर तरूणाईच दिसून येत आहे.
तरुणांना रोजगार देण्याच्या प्रचारमुद्यावर भर दिला गेला आहे. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीवर भर दिल्याने आणि मतदारांमध्ये जनजागृती करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात लाखोंच्या संख्येने नवीन मतदार नोंदणी झाली. या नवीन मतदारांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य या तरुणाईवर अवलंबून आहे. तरुणांना उत्तम शिक्षणाबरोबरच रोजगार देण्याची आश्वासने सर्वच राजकीय पक्षांतील उमेदवार देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
राजकीय अनास्थेमुळे तरुण मतदानापासून दूर जात असतानाच शासनाने मतदारांमध्ये मतदानाचा हक्क याबाबत जनजागृती सुरु केली. यातून बराचसा फरक पडल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जाणवला. तरुण पिढी ही देशाचे भवितव्य असल्याने त्यांना उत्तम शिक्षण आणि रोजगार मिळणे गरजेचे आहे. मात्र गेली अनेक वर्षे तरुणांना केवळ मतासाठी बरोबर घेत राजकीय पक्षांनी या तरुणांची निराशा केली आहे. राजकीय पक्षातील नेते तरुणांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत.