तरुण ठरताहेत भरधाव वेगाचे बळी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST2020-12-04T04:18:47+5:302020-12-04T04:18:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वेगाची नशा तरुणाईच्या जीवावर बेतत असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडे नोंद होत असलेल्या अपघातांच्या ...

Young people are becoming victims of speed ... | तरुण ठरताहेत भरधाव वेगाचे बळी...

तरुण ठरताहेत भरधाव वेगाचे बळी...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वेगाची नशा तरुणाईच्या जीवावर बेतत असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडे नोंद होत असलेल्या अपघातांच्या घटनांतून समोर येत आहे. त्यात, विनाहेल्मेट असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात भरधाव दुचाकीच्या अपघातामुळे ५१ टक्के मृत्यू झाले आहेत.

जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १७२ जणांचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकड़ा कमी आहे. तसेच मार्च आणि जून दरम्यान लॉकडाऊनच्या काळात रोड अपघातात मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र नंतर याचे प्रमाण पूर्वीसारखे होण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात ४४७ जणांना रोड अपघातात जीव गमवावा लागल्याचे वाहतूक पोलिसांच्या वार्षिक अहवालातून समोर आले आहे. तर भरधाव वाहनाच्या धडकेत ३ हजार नागरिक जखमी झाले आहेत. अशात, मुंबईत १ लाख नागरिकांमागे १० हजार वाहने २०११ ते २०१९ दरम्यान नोंद झाली. रोड अपघाताला भरधाव दुचाकीस्वार सर्वाधिक कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. यात ४७ टक्के पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. यात रोड अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के पुरुष तर २० टक्के महिलांचा समावेश होता. तर जखमींमध्येही ७५ टक्के पुरुषांचा समावेश आहे.

भरधाव दुचाकीच्या अपघातामुळे ५१ टक्के मृत्यू झाले आहेत. यात १५ ते २९ वयोगटातील तरुणाईचा समावेश होता. परिमंडळ ६ आणि ७ मध्ये सर्वाधिक अपघातांच्या घटना घडल्या आहे.

....

मुंबईतले हे जंक्शन ठरताहेत धोकादायक...

गेल्या तीन वर्षांत मुंबईतल्या घाटकोपर पूर्वेकडील अमर महल जंक्शन आणि विक्रोळीतील गोदरेज जंक्शन अपघाताचे हॉटस्पॉट ठरत आहेत. यात तीन वर्षांत १२० अपघातांच्या घटनांची नोंद झाली आहे. मुंबईतल्या १५ जंक्शनवर गेल्या ३ वर्षांत सर्वाधिक अपघात घडल्याचे दिसून आले. अमर महल जंक्शन येथे २०१७ ते २०१९ दरम्यान अपघातात २५ जणांचा बळी गेला. तर २०१८ ते २०१९ मध्ये ४० जण जखमी झाले. तर विक्रोळीच्या गोदरेज जंक्शन परिसरात १८ बळी आणि ४२ जण जखमी झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे.

......

हेल्मेटकडे दुर्लक्ष

अपघातादरम्यान डोक्याला हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला मार बसत असल्याने मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर करा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

....

गेल्या वर्षभरात मुंबईत रोड अपघातात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी

जानेवारी : ७६

फेब्रुवारी : ७३

मार्च : ८०

एप्रिल : ७४

मे : ६१

जून : ८८

जुलै : ६५

ऑगस्ट : ६४

सप्टेंबर : ६१

ऑक्टोबर : ७२

नोव्हेबर : ८९

डिसेंबर : ७३

Web Title: Young people are becoming victims of speed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.