Join us  

युवक, युवतींना नशेच्या गर्तेत बुडू देणार नाही; भाजप युवा मोर्चाच्या युवा वॅारिअर्स यात्रेच्या दुसऱ्या टप्याला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 10:18 PM

"महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराबरोबरच ड्रग्सच्या सौदागरांना संरक्षण देण्यात व्यस्त आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत आहेत, त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत आहेत, हे निषेधार्ह आहे."

मुंबई - महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतले आहे. ड्रग्जच्या माध्यमातून आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तरुण आणि तरुणी वाहावत जात आहेत. मात्र, भाजप असे कदापि होऊ देणार नाही. युवा वॅारिअर्स यात्रेच्या माध्यमातून गावा-गावात, घरोघरी जाऊन आम्ही भाजप युवा योद्धा तयार करू. असा विश्वास माजी ऊर्जा मंत्री, भाजपा प्रदेश सरचिटणीस तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी चंद्रशखेर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

युवा वॅारिअर्स यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेने मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ५ लाख युवा वॉरियर्स युवक या प्रवासात जोडले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबई भाजप कार्यालय वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराबरोबरच ड्रग्सच्या सौदागरांना संरक्षण देण्यात व्यस्त आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत आहेत, त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत आहेत, हे निषेधार्ह आहे. याचे सडेतोड उत्तर मुंबईसह महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला देईल, अशी टिका त्यांनी केली. 

 ठाकरे सरकारच्या विरोधात जनआक्रोश आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहेत, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. यावर सरकारचे नियंत्रण राहिले नाही. असे असताना देखील मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत. ठाकरे सरकारचे सर्व आमदार आपल्या गावापुरते आणि मुख्यमंत्री बांद्र्यापुरते मर्यादित असल्याची टिका त्यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतले आहे.  ड्रग्जच्या माध्यमातून आपले आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तरुण-तरुणी उत्सुक आहेत.  त्यांचा हा हेतू भाजप कदापि यशस्वी होऊ देणार नाही.  युवक - युवती यांना अनेक समस्या भेडसावात असून त्या समस्यांना वाचा फोडण्याकरीता युवा वॉरियर्स मंच काम करेल. या अभियानाच्या माध्यमातून बिगर राजकीय तरुणांना जोडले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. युवा वॉरियर्स राज्यातील तरुणांसाठी कला, क्रीडा, साहित्य, पर्यावरण, फोटोग्राफी या क्षेत्रात विविध उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने व मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईतील पाच लाख युवकांना जोडले जाईल. हे लक्ष्य आम्ही येत्या २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करू तसे यासोबतच तरुण-तरुणींना अंमली पदार्थांच्या विरोधात जागृत करण्याचे कामही आम्ही करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :भाजपाअमली पदार्थ