Join us  

भिवंडीत खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी, सात कोटींच्या दुरुस्ती नंतरही रस्त्याची दुरावस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 2:21 PM

(नितिन पंडीत) भिवंडी :  भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची पावसाळ्यात दुरावस्था झाल्याने पुन्हा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गाच्या ...

ठळक मुद्देरस्ता दुरुस्थीसाठी नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने केले होते.

(नितिन पंडीत)भिवंडी: भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची पावसाळ्यात दुरावस्था झाल्याने पुन्हा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गाच्या रस्त्यावर खड्ड्यामुळे तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. तेजस अभिमन्यू पाटील (वय 20,रा. वडघर) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस आपल्या मित्रांसह कामानिमित्त बाहेर गेला होता. घरी परतत असताना अंजुरफाटा बहात्तर गाळा परिसरात चिंचोटी अंजुरफाटा रस्त्यावर खड्डे चुकवतांना गाडी एका खड्ड्यात अदळली आणि जेतस गाडीवरुन खाली पडला. तेवढ्यात, पाठीमागे येणाऱ्या वाहनाने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

या महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे.महामार्गाच्या दुरावस्थेकडे टोल वसुली करणाऱ्या कंपनीचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. मात्र भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत नागरिकांची ही समस्या येत नसल्याने टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणेसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने केले होते. अखेर राज्य शासनाने टोल कंपनीच्या अनामत रक्कमेतून तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केला होता. मात्र दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराने थातूरमातूर दुरुस्ती केल्याने बुधवारी व गुरुवारी कोसळलेल्या पावसात रस्ता दुरुस्तीचे पितळ उघडे पडले आहे. 

गटर व्यवस्थापणेचेही कोणते काम व्यवस्थित केले नसल्याने य महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर मानकोली ते अंजुरफाटा पर्यंतच्यारस्त्यावर वळ पाडा ,  मानकोली, अंजुरफाटा, बहात्तर गाळा , कालवार , वडघर , खारबाव येथे रस्त्याची अक्षरशा दुरावस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती एका खासगी ठेकेदाराकडून करण्यात आली होती. या ठेकेदाराने रस्त्याची नेमकी कशी दुरुस्ती केली हे या पावसाळ्यात समोर येत असून भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या रस्त्यावर नागरिकांचा अपघात होत असून खासगी ठेकेदाराने केलेल्या कामाची तपासणी व निरीक्षण लवकरात लवकर करण्यात यावे व यात भ्रष्टाचार अथवा दुर्लक्ष आढळून आल्यास संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

 

टॅग्स :मुंबईभिवंडीअपघात