वडाळ्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:05 IST2021-06-01T04:05:54+5:302021-06-01T04:05:54+5:30

सीसीटीव्ही व्हायरल, परिसरात दहशत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जुन्या वादातून वडाळ्यात एका ३१ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार ...

Young man killed by stabbing in Wadala | वडाळ्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या

वडाळ्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या

सीसीटीव्ही व्हायरल, परिसरात दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुन्या वादातून वडाळ्यात एका ३१ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सामोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वसंतकुमार आरगुम देवेंद्र असे मृत तरुणाचे नाव असून वडाळा टी. टी. पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकरी आगार येथील न्यू माडा इमारतीत रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. देवेंद्र नुकताच जेवण उरकून इमारतीखाली बहिणीसोबत गप्पा मारत असताना दोन तरुण तेथे आले. देवेंद्रचा काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात राहणाऱ्या या तरुणाशी वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून त्यांनी देवेंद्र सोबत वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. दुकलीने त्याला बेदम मारहाण केली आणि सोबत आणलेल्या कोयत्याने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात देवेंद्रचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी. टी. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देवेंद्रच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. हत्येनंतर दोन्ही आरोपी पसार झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. देवेंद्र हा पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही व्हायरल झाले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसेच स्थानिकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

* बाहेरून मारेकरी मागविल्याची शक्यता

बाला नाडार हा मुख्य आरोपी असल्याचे समजते. त्याचे त्याच भागात किराणा मालाचे दुकान आहेत. त्याने सोबतीला मार्केश नाडार नावाच्या व्यक्तीला घेतले होते. मार्केश तमिळनाडूचा रहिवासी असून, मुंबईत नुकताच आला होता. तो हत्येसाठी मुंबईत आला होता अशीही माहिती समोर येत आहे.

-------------------------------

Web Title: Young man killed by stabbing in Wadala