तर मिळेल मालमत्ता करात सूट
By Admin | Updated: November 17, 2014 00:05 IST2014-11-17T00:05:09+5:302014-11-17T00:05:09+5:30
घनकचऱ्याची विल्हेवाट लावणा-या सोसायट्यांना महापालिकेच्या मालमत्ता करातून १ टक्का सूट देण्यात येईल. गृहनिर्माण संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

तर मिळेल मालमत्ता करात सूट
अनिकेत घमंडी, डोंबिवली
घनकचऱ्याची विल्हेवाट लावणा-या सोसायट्यांना महापालिकेच्या मालमत्ता करातून १ टक्का सूट देण्यात येईल. गृहनिर्माण संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आपापल्या वस्त्या, इमारती स्वच्छ ठेवाव्यात, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केले आहे.
सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून रविवारी डोंबिवलीत या अभियानामध्ये सहभागी झाल्यावर त्यांनी ही माहिती दिली. अशा उपक्रमांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा वाढत्या सहभागाबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. मात्र, केवळ हे अभियान म्हणून न राबवता त्यातून स्वच्छता हा संस्कार जीवनभर अंगी बाणावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. बहुतांशी उपनगरांमध्ये कचरा ही समस्या जटील असून आपल्या महापालिका क्षेत्रातही दिवसाला ५०० टनांहून अधिक कचरा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या सुटीतही विशेष अभियानातून दिवस-रात्र पाठपुरावा करून तब्बल १०० टन रोज जादा टन कचरा गोळा केल्याचे ते म्हणाले.
सोसायट्यांनी काय करावे
सोसायट्यांनी ओला-सुका कचरा वेगवेगळा करून त्यातून ओल्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी. त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यातून सेंद्रिय खत निर्माण करावे. या खतनिर्मितीसाठी (आॅरगॅनिक वेस्टेज कन्व्हर्टद्वारे) विशिष्ट प्रक्रिया करून (बायो) खतनिर्मिती करणारी यंत्रणा बाजारात उपलब्ध आहे. कमी क्षमतेपासून जास्तीतजास्त क्षमतेपर्यंत (२५ किलो ते ५ टन) आदी पर्यंतची विशिष्ट यंत्रणा उपलब्ध आहे. त्यासाठी संबंधित सोसायट्यांनी त्यांच्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची क्षमता बघून त्याची विल्हेवाट कशी लावावी, यासाठी प्रयत्न करावेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच अशा प्रकारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात सूट देण्याचे पारित केले.
उंदीर-घुशींसह भटक्या कुत्र्यांना आळा घाला : कचरा वाढला की, आपोआपच उंदीर-घुशींचे साम्राज्य वाढणार. त्यातच काही वर्षांपासून शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार हीदेखील समस्या झाली आहे. मात्र, या साऱ्यांचा वावर कचराकुंड्या आणि उकिरड्यांपाशी असल्याचे सर्वांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे अन्न, खराब झालेले पदार्थ, टाकाऊ चीजवस्तू आदींमुळे उंदीर-घुशी वाढतात. साहजिकच, त्यांचा सोसायट्यांमध्येही शिरकाव होतो आणि नुकसान होते. भटक्या कुत्र्यांमुळेही त्रास होतो.