आधी तुम्ही घ्या, आम्ही नंतर घेतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:28+5:302021-01-17T04:07:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील ४०० आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेना लस देण्याचे नियाेजन करण्यात आले हाेते. मात्र,२६३ जणांनीच प्रत्यक्षात ...

You take first, we take later ... | आधी तुम्ही घ्या, आम्ही नंतर घेतो...

आधी तुम्ही घ्या, आम्ही नंतर घेतो...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रायगड : जिल्ह्यातील ४०० आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेना लस देण्याचे नियाेजन करण्यात आले हाेते. मात्र,२६३ जणांनीच प्रत्यक्षात लस टाेचून घेतली आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे काेराेना लस टाेचून घेतलेल्यांपैकी एकालाही काेणताच त्रास जाणवला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली. काेराेना लसीकरणाला देशभरासह रायगड जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ४०० आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेना लस टाेचण्याचे नियाेजन हाेते. यासाठी अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालय (१००), पेण येथील उपजिल्हा रुग्णालय (१००) आणि पनवेल तालुक्यातील एमजीएम (१००), जी. डी. पाेळ फाउंडेशन (१००) या ठिकाणी एकूण ४०० जणांना लसीकरण करण्यात येणार हाेते. प्रत्यक्षात अलिबागला २७ जणांनीच लस टाेचून घेतली, तर पेण येथे २१, पनवेल येथे ९५जणांनी लस टाेचून घेतली. काेविशिल्ड लसीबाबत साशंकता असल्याने ‘आधी तुम्ही घ्या, नंतर आम्ही घेताे’, अशी मानसिकता असल्याने टार्गेट पूर्ण हाेऊ शकले नाही.

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला. जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेतील पहिले लाभार्थी होण्याचा सन्मान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांना मिळाला. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी २३ केंद्रांवर १ हजार ७४० आरोग्य सेवकाचे लसीकरण आज करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक दिवस फक्त १०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यानुसार आज को विन पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना आरोग्य सेवकांना लसीकरणासाठी बोलविण्यात आले होते. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २३ केंद्रांवर १ हजार ७४० आरोग्य सेवकांना लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण ७५.६५ टक्के आहे. ठाणे मनपाच्या ४ केंद्रांवर ३५३, कल्याण डोंबिवली मनपाच्या ३ केंद्रांवर ३००, मीरा भाईंदर मनपाच्या ६ केंद्रांवर २७८ ,नवी मुंबई मनपाच्या ४ केंद्रांवर २१७, भिवंडी मनपाच्या ३ केंद्रांवर १८४, उल्हासनगर मनपा १ केंद्रात ७१ ठाणे ग्रामीणच्या ५ केंद्रांवर ४४७ आरोग्य सेवकांना लस देण्यात आली अशी माहिती जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ अंजली चौधरी यांनी दिली.

पालघरमध्ये ४०० पैकी २९३ कोरोना योद्धयांना लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : पालघरच्या जे. जे. युनिट रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. एकूण ४०० लसींपैकी फक्त २९३ कोरोना योद्धयांवर लसीकरण करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. जिल्ह्यात चार लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. त्यात प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १०० अशा ४०० कोरोना योद्धयांचे लसीकरण करण्यात येणार होते. त्यापैकी पालघर ग्रामीण रुग्णालयात ७०, उपजिल्हा रुग्णालय जव्हार ६१, उपजिल्हा रुग्णालय डहाणू १००, वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत वरुण इंडस्ट्रिज केंद्रात ६२ अशा चार केंद्रांवर एकूण २९३ कोरोना योद्धयांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी दिली.

Web Title: You take first, we take later ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.