Join us  

‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’ ही शिवीगाळ नाही : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 6:07 AM

संबंधित जोडप्याचा २००७ मध्ये विवाह झाला. परंतु, विवाहानंतर लगेच त्यांच्यात मतभेद झाले.

मुंबई : पतीने पत्नीला ‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस,’ असे म्हणणे कोणत्याही कल्पनाशक्तीच्या जोरावर  शिवीगाळ ठरत नाही, असे म्हणत न्या. नितीन सांब्रे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने पतीची घटस्फोट याचिका मंजूर केली. अशी वाक्ये सामान्यपणे वापरली जातात. जोपर्यंत हे विधान अपमान करण्याच्या हेतूने वापरण्यात आले आहे आणि तसा संदर्भ देण्यात येत नाही, तोपर्यंत ही वाक्ये अपमानास्पद भाषा म्हणू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

संबंधित जोडप्याचा २००७ मध्ये विवाह झाला. परंतु, विवाहानंतर लगेच त्यांच्यात मतभेद झाले. पत्नीने पतीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप केला आहे. पती रात्री उशिरा घरी येतो आणि बाहेर फिरायला जाण्याची मागणी केल्यावर ओरडायचा, असे पत्नीचे म्हणणे आहे, तर पतीच्या म्हणण्यानुसार, पत्नीला लग्नापूर्वीच कल्पना होती, की ते एकत्र कुटुंबात राहतात. तरीही लग्न झाल्यानंतर ती त्याबाबत तक्रार करू लागली. पत्नी आपल्या पालकांचा आदर करत नाही आणि त्यांची काळजीही घेत नाही. काही महिन्यांतच ती सासरचे घर सोडून माहेरी गेली. 

याउलट पत्नीने दावा केली की, तिचे वैवाहिक जीवन भयावह होते. सासरच्यांनी दिलेल्या भयानक वर्तवणुकीला ती त्यापूर्वी कधीही सामोरे गेली नव्हती. उलट पतीनेच २००९ मध्ये माहेरी सोडले आणि त्यानंतर ते स्वतंत्र राहू लागले. 

...आणि पतीला मिळाला घटस्फोट२०१२ मध्ये पालिकेच्या स्थानिक निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या पतीने याचिकेत म्हटले होते की, २००९ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला असतानाही २०१३ मध्ये पत्नीने गुन्हा दाखल केला. परिणामी माझी व माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलिन झाली. पत्नीने पतीवर खोटे आरोप केले. खटल्यादरम्यान दिलेल्या साक्षीशी हे आरोप जुळत नाहीत. पत्नीने केलेले बेजबाबदार व बिनबुडाचे आरोप ही एक प्रकारची क्रूरताच आहे आणि पतीची घटस्फोट याचिका मंजूर करण्यासाठी योग्य कारण असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने पतीला पत्नीपासून घटस्फोट दिला.

टॅग्स :न्यायालयघटस्फोट