तुम्हीच शोधा तुमच्या मुलीला
By Admin | Updated: February 1, 2015 01:51 IST2015-02-01T01:51:17+5:302015-02-01T01:51:17+5:30
गोवंडीतून गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात गायब झालेल्या १७ वर्षांच्या तरुणीचे अपहरण तिच्याच काकाने केल्याचा संशय पालकांना आहे.

तुम्हीच शोधा तुमच्या मुलीला
शिवाजीनगर पोलिसांची पालकांवर अरेरावी :
दोन महिन्यांनी चुलत्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
मुंबई : गोवंडीतून गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात गायब झालेल्या १७ वर्षांच्या तरुणीचे अपहरण तिच्याच काकाने केल्याचा संशय पालकांना आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी शिवाजीनगर पोलीस तब्बल दोन महिने त्यावर बसले. इतकेच नव्हे, तर पाठपुरावा करण्यासाठी गेलेल्या पालकांना तुम्हीच शोधा तुमच्या मुलीला, असे सांगून पोलीस ठाण्यातून हाकलून दिले गेले.
शिवाजीनगर परिसरातील बैंगणवाडी परिसरात ही मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती. २६ आॅक्टोबर २०१४ला सकाळी तिची आई शौचालयाला गेली होती. काही वेळानंतर ती घरी परतली. मात्र या वेळी ही १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात नव्हती. तिने तत्काळ ही माहिती पती आणि मुलाला दिल्यानंतर त्यांनी दिवसभर तिचा या परिसरात शोध घेतला. तसेच नातेवाइकांकडे देखील चौकशी केली. मात्र तिचा कुठेही तपास लागला नाही. पालकांनी आपल्यापरीने केलेल्या चौकशीत काही दिवसांपासून घरी ये-जा वाढलेल्या श्रीकांत कारंडे या चुलत्यानेच आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक माहिती समजली. मुलगी हरवल्याची तक्रारही न घेणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांकडे पालकांनी कारंडेवर संशय व्यक्त केला. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली, मात्र ती धुडकावून लावली गेली. उलट तुम्हीच शोधा, असे सांगून पालकांना पोलीस ठाण्याबाहेर काढले गेले. पालकांनी तब्बल दोन महिने मुलीचा शोध घेतला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर पालकांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठले. तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी मुलगी हरविल्याची तक्रार नोंदवून घेतली. मात्र पोलीस नुसती तक्रार नोंदवून तोंडाला पाने पुसत असल्याचे लक्षात येताच पालकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. वरिष्ठांकडून दट्ट्या आल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून घेतला. (प्रतिनिधी)
पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन दिले
अपहृत झालेल्या मुलीला पुढल्या महिन्यात १८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे संशयित आरोपीशी हातमिळवणी करून पोलीस विनाकारण वेळ काढत आहेत की काय, असा संशय पालकांना आहे. त्याबाबत पालकांनी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी घडलेला संपूर्ण घटनाक्रम नोंद केला आहे. आता आयुक्त काय कारवाई करतात, त्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.