तुम्हीसुद्धा मतदान करा...

By Admin | Updated: October 15, 2014 04:50 IST2014-10-15T04:50:13+5:302014-10-15T04:50:13+5:30

मुंबई शहर हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर १० अधिकृत होर्डिंग्जद्वारे मतदार जागृती कार्यक्रमाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या.

You also vote ... | तुम्हीसुद्धा मतदान करा...

तुम्हीसुद्धा मतदान करा...

मुंबई : मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘ए’ विभागातील विविध ठिकाणी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन, आरोग्य विभागाने विविध कार्यक्रमांद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याबाबतचे मतदारांना आवाहन करून ‘आम्ही मतदान करणार, तुम्हीसुद्धा मतदान करा, मतदान हा एक हक्क आहे, तो आम्ही नक्कीच बजाविणार’, अशा घोषणा देऊन मतदान करण्याची नागरिकांना शपथ दिली.
मतदान जागृती अभियानाच्या अनुषंगाने ‘मतदान हा आपला हक्क आहे’, या प्रकारचे रबरी शिक्के बनवून सदरचे शिक्के जन्मदाखला अर्ज, मृत्यू दाखला अर्ज, विवाह नोंदणी अर्ज, दुकाने व आस्थापना नोंदणी अर्ज यावर उमटविण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई शहर हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर १० अधिकृत होर्डिंग्जद्वारे मतदार जागृती कार्यक्रमाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात १३ आॅक्टोबर रोजी मुंबई शहर जिल्ह्यामधील कार्यरत सर्व कर्मचारी, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका, बालविकास अधिकारी, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानामधील स्वयंसेवक व महाविद्यालयाचे एन.एस.एस.चे विद्यार्थी व समन्वयक एकत्र जमा झाले. त्यानंतर मुंबई शहराचे जिल्हाधिकारी शैला ए. आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पाटोळे यांनी सर्व उपस्थितांना १५ आॅक्टोबर रोजी मतदान करण्याची व त्याआधी मतदार यादीतील आपले नाव तपासून पाहण्याची शपथ दिली.
त्यानंतर मतदार जागृतीच्या जाहिरातीसह लाऊडस्पीकरवर मतदार जागृती गाण्यांसह ३ रथ व सर्व उपस्थित नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, फोर्ट, मुंबई ते सेंट्रल लायब्ररी, फोर्ट, मुंबई अशी पायी प्रभातफेरी काढली. या वेळी उपस्थितांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर सेंट्रल लायब्ररी येथे या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये १५० एन.एस.सी.चे विद्यार्थी, २०० कर्मचारी, स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. एकंदरीत ३५० ते ४०० नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: You also vote ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.